लोकमत न्यूज नेटवर्क
फैजपूर : लग्न झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसात रफूचक्कर झालेल्या नववधूला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे. तिला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रूपाली अशोक मुनेश्वर असे या नववधूचे नाव असून, तिचा पाडळसा येथील प्रमोद तेली याच्याशी दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० रोजी विवाह झाला होता. हा विवाह अशोक कडू चौधरी (रा. कुंभारखेडा) व रेश्मा खान ऊर्फ मीना या दोघांनी दीड लाख रुपये घेऊन लावून दिला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांनी आईची तब्येत बरी नसल्याचे सांगून कथित मावस बहीण रेश्मासोबत गेलेली रूपाली रफूचक्कर झाली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रमोद याने पोलिसात तक्रार दिली होती.
त्यानंतर पोलिसांनी अशोक चौधरी व रेशमा यांना अटक केली होती. रेशमा हिला सोबत घेऊन हे. कॉ. सुधाकर पाटील व सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे यांनी औरंगाबाद व उमरखेड जि. यवतमाळ येथे नववधू रूपालीचा शोध घेतला. औरंगाबाद येथील रामनगर विठ्ठल चौक येथून रुपाली व रेश्मा यांना अटक करण्यात आली. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रूपाली व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणखी किती तरुणांना गंडा घातला आहे, याची माहिती घेतली जात असल्याचे तपास अधिकारी सुधाकर पाटील यांनी सांगितले. तपास सपोनि प्रकाश वानखेडे व कॉ. सुधाकर पाटील करीत आहेत.