लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिव कॉलनी चौक हा महामार्गावरील शहरातील सर्वांत धोकादायक चौक म्हणून ओळखला जातो. येथे अपघात होण्याची शक्यता सर्वांत जास्त आहे. येथे महामार्ग ओलांडण्यासाठी कोणतीही सुविधा करून देण्यात आलेली नाही. तसेच एका बाजूने पिंप्राळा रेल्वे ओव्हर ब्रिज आहे. त्यामुळे तेथून उतारावरून वेगाने वाहने येतात आणि त्यांना थांबविण्यासाठी शिव कॉलनी चौकात कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही. त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण जास्त आहे. सायंकाळच्या वेळी रस्ता ओलांडताना भल्याभल्यांना घाम फुटतो. असे असले तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुलाला मंजुरी दिली गेली नाही. त्यामुळे आजही येथे अपघाताची भीती कायम आहे. नुकताच याच ठिकाणी ३७ वर्षांच्या तरुणाचा अपघातात बळी गेला आहे.
शिव कॉलनी चौकाला पोलिसांनी रस्ते अपघाताच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉट जाहीर केले आहे. ज्या भागात ५०० मीटरच्या अंतरात वारंवार अपघात होत असतात, तेथे ब्लॅक स्पॉट पोलिसांकडूनच जाहीर केला जातो. त्यामुळे या चौकात रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग असणे गरजेचे होते. त्यासाठी नागरिक गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मागणी करीत होते.
२०१७ च्या सुमारास महामार्ग प्राधिकरणाकडून खोटे नगर ते कालंका माता मंदिर या रस्त्याच्या कामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यात शिव कॉलनी वगळता इतर सर्व प्रमुख चौकांमध्ये भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल नियोजित करण्यात आले. त्यानंतर शिव कॉलनीवासीयांनी २०२० मध्ये खासदार उन्मेश पाटील यांची भेट घेतली. त्यांनीही शिव कॉलनीजवळ भुयारी मार्गासाठी प्रयत्न सुरू केले. जनतेला आश्वास्त देखील केले. मात्र, त्यांच्या आश्वासनानंतर एक कागदी प्रस्ताव तयार करून नागपूरला महामार्ग प्राधिकरणाच्या सल्लागारांकडे पाठविण्यात आला. त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.
आधी खराब रस्त्याने, मग रस्त्याच्या कामाने देखील घेतले बळी
रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याच्या आधी खराब रस्त्याने अनेकांचे बळी घेतले होते. हा शहरातून जाणाऱ्या महामार्गाची मृत्यूचा मार्ग अशी ओळख निर्माण झाली होती, तर आता सुमारे दीड वर्षापासून या आठ किमीच्या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे देखील अनेकांचे बळी जात आहे. शिव कॉलनीत झालेल्या या अपघाताच्या आधीदेखील सालार नगर, मिल्लत नगर येथे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात झालेल्या अपघातांनी दोनजणांचे बळी घेतले होते. या महामार्गाच्या कामासाठी आणखी किती बळी जाणार, असा प्रश्न जळगावकर उपस्थित करीत आहेत.
कामाला अपेक्षित वेग कधी
महामार्गाचे काम गेल्या काही दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. ठेकेदाराकडे सध्या कामासाठी फक्त २५ मजूर आणि ६ कर्मचारी आहेत. त्यामुळे कामाचा वेग मंदावला आहे. या कामाची मुदत जून २०२१ पर्यंतच आहे. त्यामुळे या वेळेत काम करण्याचे आव्हान ठेकेदार संस्थेकडे आहे. सध्या हे काम ७० टक्के पूर्ण झालेले असल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे.
कोट - सध्या आमच्याकडे फक्त २५ मजूर आहेत आणि सहा कर्मचारी आहेत. आम्ही काही मजूर मध्य प्रदेशातून बोलावले आहेत. ते देखील लवकरच येतील. त्यात सध्या अडचणी आहेत. आम्ही आसपासच्या भागातून मजूर शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. - सुजितकुमार सिंग, ठेकेदार संस्थेचे प्रकल्प उपसंचालक
महामार्ग
अंतर ७ किमी
किंमत ६१ कोटी
कामाची मुदत जून २०२१