मनपाच्या हायहोल्टेज ड्रामावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया : सोशल मीडियावरही भाजप फुटीचा ट्रेंड
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाच्या महापौर व उपमहापौर निवडीआधी सुरू झालेल्या ‘हायहोल्टेज ड्राम्या’ची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. एकीकडे भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते ‘महापौर आमचाच’ अशा वल्गना करत आहेत, तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून शहरातील खड्डे व धुळीमुळे त्रस्त असलेल्या जळगावकरांनी कोणाचीही सत्ता आणा. मात्र, आधी शहरातील रस्ते करा, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीआधीच भाजपचे २७ नगरसेवक गायब झाल्यामुळे रविवारपासून शहरात एकच चर्चा सुरू आहे. सोमवारी दिवसभर प्रत्येक कट्ट्यावर व व्हॉटसॲप ग्रुपवरदेखील भाजप फुटीवरच चर्चा सुरू होत्या. आता सत्ता कोणाची ? भाजप की शिवसेना याच विषयावर सर्वच सोशल साईट्सवर दावे-प्रतिदावे केले जात होते, तर शिवसेना व भाजप कार्यकर्तेदेखील या फुटीवरून सोशल साईट्सवर आमने-सामने झालेले दिसून आले. अनेक राजकीय विश्लेषक आपापले दावे व मतं सोशल मीडियावर सादर करत असल्याचे चित्र पहायला मिळाले. एकूणच काय तर सोशल मीडियावर दिवसभर मनपातील राजकीय भूकंपाचा विषय ट्रेंड करत असल्याचे पहायला मिळाले.
बालानींचा फोटो अन् कैलास सोनवणेंची पोस्टही चर्चेत
सोशल मीडियावर भाजप व शिवसेनेचे नगरसेवकदेखील एकमेकांना कानपिचक्या घेत असल्याचे दिसून आले. भाजपचे गटनेते भगत बालानी यांचा काळे कपडे व काळा मास्क घालून पत्ते खेळत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला, तर कैलास सोनवणे यांनीही श्रीराम यांची वानरसेना माणसांच्या सेनेपेक्षा कशी नि:स्वार्थी व एकनिष्ठ होती अशा प्रकारच्या संदेशाची पोस्ट व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केली होती. या पोस्टवरदेखील अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या दिसून आल्या, तर जळगावकरांनी या हायहोल्टेज ड्राम्याकडे दुर्लक्ष करत, केवळ शहरातील समस्या आधी सोडविण्याचे आवाहन दोन्ही पक्षांना केलेले दिसून आले.