महावितरणतर्फे गेल्या महिनाभरापासून पावसाळा पूर्व नियोजनाची कामे सुरू आहेत. यामध्ये विद्युत ट्रान्सफाॅर्मरची पाहणी करणे, त्या मध्ये नवीन ऑइल भरणे, वाकलेले पोल व विद्युत तारा सरळ करणे, डीपीवरील गंजलेली विविध साधनसामग्री बदलविणे, तसेच विद्युत तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे आदी कामे पावसाळ्यापूर्वी केली जातात. ज्यामुळे पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी असते.
दरम्यान, महावितरणतर्फे जळगाव शहरातील विविध भागात युद्ध विविध प्रकारची मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. यासाठी शहरातील विविध भागांतील वीज तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविण्यात येत आहेत. चार दिवसांपूर्वी काव्यरत्नावली चौक परिसर, रामानंद नगर परिसर, रिंग रोड, गणेश कॉलनी परिसर, महाबळ रोड या भागात अनेक ठिकाणी अडथळा ठरणाऱ्या फांद्या तोडण्यात आल्या. मात्र, तोडल्यानंतर या फांद्याची विल्हेवाट न लावता, जागेवरच पडू दिल्या आहेत. मोठ-मोठ्या आकाराच्या या फांद्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, यामुळे वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या फांद्यामुळे रात्रीच्या वेळी नजरचुकीने अपघातदेखील घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने तातडीने या फांद्या उचलण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
इन्फो :
वीज तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर, त्या लगेच उचलण्याबाबत कर्मचाऱ्यांना सांगितले असून, कर्मचाऱ्यांतर्फे ते उचलण्याचेही काम सुरूच आहे. संबंधित ठिकाणच्याही फांद्याही लवकरच उचलल्या जातील.
-एन. बी. चौधरी, प्रभारी कार्यकारी अभियंता, जळगाव शहर