लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भावाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पवन अरूण भोई (वय २५) या तरूणाला चार जणांनी मारहाण करून तीक्ष्ण हत्याराने गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी पिंप्राळा भागात घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात रात्री उशिरा खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गल्लीतील शुभम साहेबराव शिवदे, निखिल शिवदे, सागर बाळू शिवदे आणि सनी साहेबराव शिवदे यांनी पवन भोई यांच्या भावाला काहीही कारण नसताना शिवीगाळ केली. त्यावेळी भाऊ रडत असल्याचे पाहून पवन भोई याने याचा जाब चौघांना विचारला, त्याचा राग आल्याने चौघांनी पवन भोई याला पाठीमागे तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. दोन्ही भावांना बेदम मारहाण व शिवीगाळ करून बंदुकीच्या गोळीने ठार मारण्याची धमकी दिली. जखमी पवन भोई याला तातडीने शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पवन भोई याच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री उशिरा चौघांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास संदीप परदेशी करत आहे.