मेहुणबारे, जि. जळगाव - बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून खाजोळा, ता.पाचोरा येथे दुचाकीवर घरी परतणाऱ्या भावाच्या दुचाकीला कारने धडक दिल्याने प्रवीण हेमराज पाटील वय (३५) हा भाऊ ठार झाला. या अपघातात वधूचे काका गुलाब दगा पाटील (६५) हे जखमी झाले. हा अपघात चाळीसगाव - धुळे महामार्गावर चिंचगव्हाण फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर ९ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला.खाजोळा ता.पाचोरा येथील प्रवीण हेमराज पाटील व त्यांचे काका गुलाब दगा पाटील (६५) हे दोघे दुचाकीने (क्रमांक एम.एच. १९, सीएच ४२७६) लग्न पत्रिका वाटण्यासाठी घरून निघालेले होते. दोघांनी दहीवद (ता.चाळीसगाव) येथे मुक्काम केला व ९ रोजी पुन्हा पत्रिका वाटण्याकरीता ते निघाले.सायंकाळी घरी परतत असताना चिंचगव्हाण फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर चाळीसगावकडून धुळ््याकडे भरधाव वेगाने जाणाºया कारने (क्रमांक एमएच १८, डब्यू २१२८) समोरून येणाºया वाहनाला ओहरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोरदार धडक दिली.या धडकेत प्रवीण पाटील हे जागीच ठार झाले तर काकाचा एक पाय मोडून गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यावर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी मेहुणबारे पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक नजीम शेख, पोलीस हवालदार पांडुरंग पाटील, गफूर शेख यांनी पंचनामा केला. अपघात घडताच कारमधील दोघेही फरार झाले.प्रवीण पाटील यांचा मृतदेह विच्छेदन करण्यासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात हलविला. तर गुलाब पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कारमधील दोघांनी मद्यपान केले होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून परतणारा भाऊ अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:32 PM