मनवेल, ता.यावल : मृत्यू हे अंतिम सत्य आहे, मात्र ऐन तारुण्यात व उमेदीच्या काळात अकाली मृत्यू येणे ही फार दुःखदायक व मनाला चटका लावून जाणारी अशी घटना आहे. अशीच घटना साकळी, ता. यावल येथील कोळी परिवाराच्या नशिबी आली. बत्तीस वर्षीय आई-वडिलांचा एकुलता मुलगा व दोघा बहिणींचा एकुलता एक भाऊ अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने अंत्ययात्रेत बहिणींचा आर्त टाहो हा मन हेलावून टाकणारा होता. ‘भाऊ तू मला शेवटचेच पाणी टाकायला बोलावले का रे !’ ... हे बहीण मनीषाचे वाक्य ऐकून अनेकांचे डोळे पाणावले होते.
या दु:खद घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, साकळी, ता.यावल येथील भवानी पेठ भागातील रहिवासी असलेले रामलाल धोंडू कोळी यांना कैलास (३२ ) नावाचा एकुलता मुलगा होता. कैलासचा मृत्यू होण्याअगोदर चार-पाच दिवस आधी त्याला अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवला. दरम्यान त्याने लगेचच गावात उपचार घेतले. मात्र त्रास जास्त जाणवू लागल्याने त्याला लागलीच १२ रोजी जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्याला ब्रेन हॅमरेजचा त्रास झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कैलासच्या डोक्याच्या भागात मोठी शस्त्रक्रियाही झाली मात्र त्याची तब्येत अधिकच खालवत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ४ रोजी मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यावर दोन दिवस मोठ्या शर्तीने उपचार सुरू होते मात्र अखेर १६ दुपारी तीन वाजता कैलासाची प्राणज्योत मालवली. चारच दिवसात मृत्यू ठरला वरचढ.
मयत कैलासचा जीवन-मरणाशी सुरू असलेला संघर्ष अवघ्या चार दिवसातच थांबला. घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पत्नी आणि मुलीचे छत्र हरपले
मयत कैलासच्या पश्चात आई-वडील,पत्नी व १३ महिन्यांची मुलगी वंशिका तसेच तीन काका, आत्या यांचेसह मोठा परिवार आहे. वडील रामलाल कोळी यावल महसूल विभागात नोकरीला असून मयत कैलास हा हिंगोणा, ता.यावल येथील प्रा.आ.केंद्रात परिचर म्हणून सेवेत होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.