कासोदा, ता. एरंडोल : येथील १८ वर्षांच्या तरुणाच्या घशात दात घासताना सहा इंचाचा ब्रश घशात गेला. काही केल्या तो निघेना, एक्सरेत पण दिसेना. दुर्बीण टाकून तो दिसला. महत्प्रयासाने काढल्यावर तरुणाचा जीव वाचला. ही आश्चर्यकारक व सहजासहजी मनाला न पटणारी घटना येथे घडली.
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील शेजवळकर या उपनगरात लालचंद पांचाळ हे पत्नी, एक मुलगा व एक मुलगीसह परंपरागत पांचाळ काम करून आपला संसार चालवितात. दि. २८ मे रोजी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे त्यांचा १८ वर्षांचा १२वी सायन्सचे शिक्षण घेणारा मुलगा मयूर हा दात घासल्यानंतर जीभ स्वच्छ करीत असतानाच दात घासण्याचा ब्रश अचानक त्याच्या घशात गेला. तो ब्रश बाहेर ओढत होता; पण ब्रश काही केल्या बाहेर न येता घशात आतच जात होत. अखेर ब्रश घशात लांबपर्यंत गेलाच. ही घटना त्याने आई-वडिलांना सांगितली. सर्वच कुटुंबीय घाबरले. तातडीने गावातील डॉक्टरांकडे त्याला नेले. त्यांनी वेदनाशामक उपचार करून ताबडतोब जळगावला नेण्याची सूचना केली. जळगाव येथे डॉ. दातार यांना दाखविल्यानंतर त्यांनी डॉ. ऋषिकेश चौधरी यांच्याकडे पाठविले. डॉक्टरांनी सविस्तर माहिती विचारली व घशाचे एक-दोन नव्हे, तीन एक्सरे काढले. परंतु, ब्रश काही दिसत नव्हता. शेवटी दुर्बीण टाकून हा ब्रश दिसला. विशेष दुर्बीणद्वारे हा ब्रश काढण्यात आल्यानंतर या कुटुंबाला हायसे वाटले.
१८ सेंटिमीटरचा हा ब्रश होता. प्लास्टिक एक्सरेत दिसत नाही, त्यामुळे स्पेशल दुर्बीणद्वारे त्याला काढण्यात आले. आतिशय नाजूक व आतील भागात इजा न होऊ देता तो काढणे हे जास्त जिकिरीचे होते. फ्लेक्झिबल इंडोस्कोपीद्वारे पाहून त्याद्वारे ऑपरेट केले, अशी माहिती डॉ. चौधरी यांनी दिली.