आरटीओ कार्यालयाला यात्रेचे स्वरुप : लांबच लांब रांगामुळे नागरिकांची गैरसोय
जळगाव : सवलतीच्या दरात खरेदी केलेल्या बीएस 3 या वाहनांची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाल्यानंतर या वाहनांची नोंदणी करण्यासाठी जळगाव आर.टी.ओ.कार्यालयासह चाळीसगाव येथील कॅम्पमध्ये वाहनधारकांची मोठी गर्दी झाली आहे. जळगाव येथे दुपारी 12 वाजेर्पयत 500 पेक्षा जास्त वाहने दाखल झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीएस 3 वाहनांवर 1 एप्रिलपासून बंदी टाकण्यात आली आहे. या दरम्यान बंदी घातलेल्या या मॉडेलवर 5 ते 20 हजारांर्पयत सवलत दिली होती. त्यामुळे दुचाकी व मोपेड वाहन खरेदीसाठी अनेक कंपन्यांच्या शोरुमबाहेर मोठी गर्दी झाली होती. दोन दिवसांच्या कालावधीत मोठय़ा प्रमाणात वाहनांची विक्री झाल्यानंतर या वाहनांच्या नोंदणीसाठी 6 एप्रिल ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे बुधवार 5 रोजी जळगावच्या आर.टी.ओ.कार्यालयासह चाळीसगाव येथे लावण्यात आलेल्या कॅम्पच्या ठिकाणी वाहनधारकांनी गर्दी केली होती. सकाळी 9 वाजेपासून वाहनधारकांनी कार्यालयात येत नोंदणीची प्रक्रिया सुरु केली होती. जळगाव कार्यालयात दुपार्पयत 500 वाहनधारक थांबून होते. तर चाळीसगाव येथे 100 ते 200 वाहनधारक थांबून होते. उन्हाचा पारा जास्त असताना वाहनधारकांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिक मात्र त्रस्त झाले होते.