स्ट्रीप - पुस्तक परिचय.
जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातील तापी नदी काठावर वसलेलं अनवर्दे हे गाव. घरातल्या बापाचं छत्र केव्हाच हरपलेले. शिक्षणासाठी हाती पाटी आणि पुस्तक देत शेतकाम, मजुरीसाठी निघून गेलेल्या आईच्या कष्टाचे चीज करायचं असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षणाचा विचार अंगिकारल्याशिवाय प्रगती नाही, असा मनोमन विचार करत त्यांनी वाटचाल सुरू केली. त्या राजेंद्र पारे यांच्या नावावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चरित्र), बुद्धांचा मार्ग (लहान मुलांसाठी चरित्रपर), मागचे दार (कथासंग्रह), ठिगळं अन् टाके (कवितासंग्रह) ही पुस्तके आहेत. याच्यासोबतच त्यांनी आता ‘बुद्धा इज स्मायलिंग’ ही कादंबरी लिहून कादंबरी क्षेत्रातदेखील पाऊल टाकले आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचार हा माणसांच्या कल्याणाचा दुःख मुक्तीचा आणि जगाच्या कल्याणाचा. निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक जीवसृष्टीचा विचार करणारी ही विचारधारा माणसं, पशु, प्राण्यांच्या अर्थात साऱ्यांच्याच जगण्याच्या दिशा कशी समृद्ध करते हे अनेकांना ज्ञात आहे.
‘बुद्धा इज स्माईलिंग’ कादंबरीतून राजेंद्र पारे यांनी अनेक पात्रांच्या माध्यमातून भुतकाळातल्या अनेक घटनांचा मागोवा घेत वर्तमानातली वास्तवता मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी १८ मे १९७४ बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अणुचाचणी घेऊन इतिहास निर्माण केला. तो सर्वश्रुत आहे बुद्ध हसला असे या मोहिमेचे नामकरण करण्यात आलं होतं. त्यादिवशी जन्माला आलेला दीपंकर हा कादंबरीचा नायक आहे. तो आपल्या सहचारिणी असणाऱ्या शीतलला आपल्या भुतकाळातल्या इतिहासाची माहिती कथन करीत वर्तमानात घडलेल्या घटना किती कशा परिणामकारक आहेत हे मांडत जातो.
भारतभर पसरलेला ग्रामीण समाज, समाजाच्या चालीरीती त्यासोबतच आयुष्याचा पिच्छा न सोडणारी व्यसनाधिनता, माणसामाणसांत सत्ता आणि अस्तित्वासाठी चाललेला संघर्ष, स्पर्धा या साऱ्या गोष्टी लेखक राजेंद्र पारे बारकाईने मांडतात मुळातच समाजव्यवस्थेची पायाभरणी चालीरीती आणि बहू विविधतेवर उभारलेली आहे. प्रत्येक पिढी या पाऊलवाटेवर चालत असते. त्यात वेगवेगळ्या गोष्टीची कशा कशा प्रकारे भर टाकत असते हेदेखील कादंबरीतील पात्रांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते. माणसांच्या मनाला बोलके करीत त्याच्या संवेदना, दुःख, दारिद्र्य आणि सामाजिक विश्लेषण मांडणारी ही कादंबरी ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देत आपल्या साऱ्यांच्या, वाचकांच्या अंतःकरणाला त्यासोबतच नव्या पिढीला वास्तवतेचे भान आणत नव्या जाणिवा उलगडत जाते.
कादंबरीतल्या एकूण १७ प्रकरणांत भारतीय समाज व्यवस्थेत घडलेल्या विविध गोष्टींचा समावेश करीत मानवी कल्याणासाठीचा विचार मांडण्यात आलेला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय या सार्या घटनांचा अंतर्भाव कादंबरीत लेखकाने केलेला आहे. कादंबरीतून जो विचार लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची सलगता असणे आवश्यक होती ती मधल्या भागात खंडित होऊ पाहत आहे. त्यामुळे कादंबरी, लेखक मूळ कथानकापासून दूर जात नाही ना? असाही विचार मनात डोकावून जातो.
लेखक राजेंद्र पारे यांनी ‘बुद्धा इज स्माईलिंग’ कादंबरीतून ऐतिहासिकता डोकावताना दिसते त्यातून वाचकांनी आपल्या जीवनाची सुख-समृद्धी कशी दृढ करावी याचे सूचक, असे विचारदेखील स्पष्ट करते.
अमरावतीच्या नभ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘बुद्धा इज स्माईलिंग’ कादंबरीला साहित्यिक किरण शिवहर डोंगरदिवे यांची
प्रस्तावना असून, महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी पाठराखण केली आहे. चित्रकार बुद्धभूषण साळवे यांनी कादंबरीचा आशयच चित्रातून मुखपृष्ठ वर मांडलेला आहे.
चुडामण बोरसे, जळगाव