लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराची शान म्हटल्या जाणाऱ्या मेहरूण तलाव परिसरातील जैवविविधतेचे रक्षण व या परिसरातील पक्षी संवर्धनासाठी मनपाकडून स्वतंत्र उपाययोजना अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या नाहीत. त्यातच दररोज होणारी मेहरूण तलावाची दुर्दशा रोखण्यातदेखील महापालिकेला अपयश येत आहे. मेहरूण तलावाच्या पाण्यात दररोज दोनशेहून अधिक म्हशींचा वावर वाढला असून, यामुळे तलावातील पाण्याचे प्रदूषणदेखील वाढत आहे. महापालिकेला तलावात जाणाऱ्या सांडपाण्यावरदेखील अजूनसुद्धा कोणतेही नियोजन करता आलेले नाही, अशा परिस्थितीत आता तलाव परिसरात म्हशींचा वाढत जाणारा वावर तलावातील जैवविविधतेसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
मेहरूण तलाव परिसर हा जैवविविधतेने नटलेला परिसर असून, या तलाव परिसरात अनेक पक्षीदेखील आढळतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील जैवविविधता नष्ट होण्याचा मार्गावर असून, तलाव परिसरातील पर्यावरणदेखील धोक्यात आले आहे. तलावावर जरी जिल्हा प्रशासनाचा हक्क असला तरी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही मनपा प्रशासनाची आहे. मनपा प्रशासनाने आतापर्यंत डीपीडीसी व मनपाच्या तिजोरीतून मेहरूण तलाव परिसराच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधीचा खर्च केला आहे. एकीकडे तलाव परिसराचे सुशोभीकरण होत असताना दुसरीकडे पर्यावरणीयदृष्ट्या जे लक्ष देण्याची गरज होती, ते लक्ष मनपा किंवा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. मेहरूण तलावात परिसरातील रहिवासी इमारतींमधून येणारे घाण पाणी थेट तलावात सोडण्यात आले असून, अनेक वर्षांपासून भारती प्रतिष्ठानसह अनेक पर्यावरण संरक्षणासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांकडून मनपा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र, मनपाकडून याबाबत अजूनही कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तसेच तलाव परिसरात वाढत जाणाऱ्या म्हशींचा वावर रोखण्यासाठी महापौरांनीदेखील सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांचेदेखील पालन होताना दिसून येत नाही.