लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांची चिंता करु नये. यंदा राज्य शासनाच्या कृषी विभागाने युरियाचा दीड लाख मेट्रिक टन खतांचा बफर स्टाॅक केला आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी देवळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली.
शनिवारी सायंकाळी तालुका कृषी विभागामार्फत आयोजित शेतकरी अवजार बँकेचा शुभारंभ मंत्री भुसे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. देवळी येथील आत्माअंतर्गत स्थापित क्रांतिवीर रेशीम उत्पादक गटाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांची अवजार बँक सुरु करण्यात आली आहे. गटाच्या सदस्यांनी एकत्र येऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोकरा अंतर्गत कमी अंतराच्या पिकांत व फळबागेत आंतरमशागतीस येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टर व त्यासोबत अवजारे स्वनिधीतून खरेदी केले व त्यासाठी शेड सुद्धा स्वनिधीतून बांधण्यात आले. यासाठी १८ लाख २२ हजार रुपयांचे कृषी अवजार सेवा केंद्राची स्थापना केली. गटाचे अध्यक्ष विवेक रणदिवे यांनी भुसे यांना माहिती दिली.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी यनवाड, पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, कृषी अधिकारी एम. एस. भालेराव, पल्लवी हिरवे, मंडळ कृषी अधिकारी संजय पगारे, तंत्रज्ञान व्यवस्थापक ज्ञानेश्वर पवार यांच्यासह देवळी, दडपिंप्री, आडगाव, पिंप्री, चिंचखेडे, डोणपिंप्री, भोरस आदी गावातील शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांचे गटाचे अध्यक्ष विवेक रणदिवे यांनी आभार मानले.
३१ लाख शेतकऱ्यांना २० हजार कोटीची कर्जमाफी
कृषिमंत्र्यांनी खुर्चीवर न बसता जमिनीवर बसून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. राज्यात कुठेही युरिया खताची टंचाई जाणवल्यास केवळ दोनच दिवसात त्याठिकाणी शासन युरिया उपलब्ध करून देईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कुठेही कृषी केंद्र चालकांकडून अडवणूक किंवा लुबाडणूक करण्यात येत असल्यास तत्काळ तक्रार करण्याचे व आपणास कळवण्याची सूचनादेखील दादा भुसे यांनी केली. ३१ लाख शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य शासनाने दिली आहे. उर्वरित वंचित शेतकऱ्यांनाही कोरोना संकटानंतर राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याबरोबर कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. जंगली श्वापदांपासून शेतीच्या संरक्षणासाठी सरकारने पोकरा अंतर्गत शेतीला कुंपणाच्या योजनेत समाविष्ट करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने पद्माकर पाटील यांनी यावेळी केली.