लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपच्या चार नगरसेवकांकडून शहरालगतची पाच गावे महापालिका हद्दीत समावेश करून घेण्याबाबतचा ठराव करण्यात आला. एकीकडे जळगाव शहरातील नागरिकांना मुलभुत सुविधा मिळत नसताना, दुसरीकडे इतर गावांचा समावेश महापालिका हद्दीत करण्याचा ठरावावरून सत्ताधारी भाजपच्याच अनेक सदस्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे हद्दवाढीचा ठरावामागे शहर व जिल्ह्यातील मोठी बिल्डर लॉबी सक्रिय आहे. परिसरात घेतलेल्या जमिनींचे भाव वाढावेत त्यासाठी हद्दवाढीच्या प्रस्ताचा खटाटोप करण्यात आल्याची चर्चा आता रंगली आहे.
जळगावकरांना गेल्या काही वर्षांपासून रस्ते, आरोग्य, स्वच्छता अशा समस्यांपासून वंचित रहावे लागत आहे. सत्ताधारी भाजप देखील नागरिकांना सुविधा देण्यात अपयश आले आहे. अशा परिस्थितीत आव्हाणे, कुसुंबा, मन्यारखेडा, सावखेडा व मोहाडी या गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्याबाबतचा ठराव महासभेत बहूमताने मंजूर करून घेतला आहे. यामागे सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी प्रस्ताव देताना या गावांचा सर्वांगिण विकासाबाबतचे कारण पुढे केले आहे. मात्र, या ठरावामागे मोठी बिल्डर लॉबी सक्रिय असून, काही बिल्डरांना फायदा व्हावा यासह पुढील राजकीय पुनर्वसनासाठी देखील हा ठराव केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठरावाला भाजपच्या नगरसेवकांचा होता विरोध
महासभेआधी झालेल्या भाजपच्या पक्षीय बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावावर भाजपच्या अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच शहराच्या समस्या अजून सोडविल्या जात नसताना परिसरातील गावांचा मनपा हद्दीत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव देत ठराव केला तर विरोधकांसह अनेकांकडून विरोध होवू शकतो असे मत काही नगरसेवकांचे होते. मात्र, याबाबत पक्षाकडून हा ठराव मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेकांचा विरोध असतानाही पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार सत्ताधारी भाजपने हा विषय बहूमताने मंजूर करून घेतला असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली आहे.
जमिनींचे दर वाढविण्यासाठी खटाटोप
जळगाव शहराची हद्दवाढ १९८५ पासून झालेली नाही. १९८५ मध्ये खेडी व पिंप्राळ्याचा समावेश महापालिकेत करण्यात आला होता. मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत ही हद्दवाढ करण्यात आलेली नाही. नेहमी आसोदा, ममुराबाद या गावांचा देखील महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबत चर्चा सुरु असतात, मात्र याबाबतचा प्रस्ताव अद्यापपर्यंत आलेला नाही. दरम्यान, जळगाव शहरालगत अनेक वर्षांपासून आव्हाणे, मोहाडी, मन्यारखेडा, कुसूंबा, सावखेडा परिसरात जमिनी घेतल्या आहेत. या गावांचा किंवा या गावातील शिवारालगतच्या भागाचा जळगाव महापालिकेच्या हद्दीत समावेश झाला. तर या जमिनींच्या मुल्य रक्कमेत वाढ होवून जमिनींचे दर वाढतील या अपेक्षेने ही खेळी खेळण्यात आल्याची चर्चा आहे.
त्या राजकीय शक्यतेनेही दिला गेला प्रस्ताव
त्यातच गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहर मतदासंघाचे २ मतदारसंघ होणार असल्याची चर्चा होती. यामध्ये उत्तर व पश्चिम जळगाव अशा मतदारसंघाचा समावेश राहणार आहे. यासाठी देखील हद्दवाढीचा खटाटोप करण्यात आल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. दरम्यान, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी हा प्रस्ताव पुर्ण गावे ताब्यात घेण्याचा नसून, जी गावे स्वत:हून येण्यास तयार आहेत. तसेच जे नवीन भाग विकसीत झाले आहेत. त्यांची हद्द मनपात नसली तरी ते नागरिक संबधीत गावांमधील देखील नाहीत अशा भागांचा समावेश करण्याचा प्रस्ताव सभेत मांडला असल्याची माहिती घुगे-पाटील यांनी दिली.
कोट..
हद्दवाढीचा प्रस्ताव हा बिल्डर लॉबीचा होणारा फायदा घेवून घेण्यात आला आहे. गावांचा विकास करू, त्यांना सुविधा देवू हे सत्ताधाऱ्यांकडून केवळ कारण पुढे केले जात आहे. जळगावकरांना खड्डयात टाकून आता जळगावलगतच्या गावांमधील नागरिकांना देखील खड्ड्यात टाकण्यासाठीचा हा प्रकार आहे.
-सुनील महाजन, विरोधी पक्षनेते, शिवसेना