ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 19- प्लॉट खरेदीच्या नावाखाली बिल्डर व सामान्य नागरिकांना कोटय़वधीचा गंडा घातल्याप्रकरणी बिल्डर इरफान अहमद शकील अहमद पटेल (वय 33 रा. साकेगाव, ता.भुसावळ ह.मु.मुंबई) याला सोमवारी दुपारी दोन वाजता गुंतवणुकदारांनी गोविंदा रिक्षा थांब्याजवळ झोडपले. इरफान हा फसवणूक प्रकरणात दाखल खासगी खटल्यात न्यायालयाने बजावलेल्या वारंटवर हजर होण्यासाठी पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आला होता.इरफान शहरात येत असल्याची माहिती मिळताच गुंतवणुकदार आले एकत्रइरफान हा जळगाव न्यायालयात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव शहर व परिसरातील गुंतवणुकदार सोमवारी एकत्र आले. इरफान हा पोलीस बंदोबस्तात न्यायालयाकडे येत असताना गोविंदा रिक्षा थांब्याजवळ त्याला अडविले व त्याला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका केली व त्याला न्यायालयात आणले.पोलीस बंदोबस्तात आला न्यायालयातइरफान हा न्या.नेमाडे यांच्या न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याच्या बंदोबस्तासाठी मुंबई येथून एक अधिकारी व चार कर्मचारी आले होते. स्वत: अलिशान कार व त्याच्या पान 1 वरूनमागेपुढे आणखी काही कार अशा थाटात इरफान न्यायालयात आला होता. रस्त्यावरुन येताना गुंतवणुकदारांनी मारहाण केल्याने तसेच न्यायालय परिसरात गुंतवणुकदारांची झालेली गर्दी पाहून बंदोबस्तासाठी आलेले पोलीस तेथून गायब झाले. दुचाकीवरुन काढला पळन्यायालयाने पुढील कामकाज 9 जानेवारीला ठेवल्याचे जाहीर झाल्यानंतर इरफान हा न्यायालयातून बाहेर आला व नंतर त्याच्या दिमतीला एक दुचाकी तयार होती. त्यावर तिघे जण बसून तेथून निसटले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गुंतवणुकदारांनी त्याचा पाठलाग केला, मात्र उपयोग झाला नाही. गल्लीबोळातून तो कुठे गायब झाला हे कोणाच्या लक्षात आले नाही. या प्रकाराने गुंतवणुकदार चक्रावले.न्यायालयात कामकाज सुरु असताना परिसरात उभ्या असलेल्या कार व पोलीसही गायब झाले होते. इरफान याने 25 ते 30 जणांची 15 कोटीच्यावर फसवणूक केल्याचा दावा न्यायालयात आलेल्या गुंतवणुकदारांनी केला. नातेवाईकांनाही त्याने गंडा घातला आहे. या तगाद्यामुळे तो साकेगावातून गायब झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अशी केली बिल्डरने फसवणूकमोहम्मद रफीक शेख मुसा (वय 42, रा.अक्सा नगर, मेहरुण, जळगाव) यांनी कंडारी, ता.भुसावळ येथील शेत स.न.180/1 अ, 180/1 ब 2 यातील बिनशेती प्लॉटमधील बखळ प्लॉट क्र.3, क्षेत्रफळ 666.00 चौरस मीटर 71 लाख 68 हजार रुपयात विक्री करण्याबाबत इरफान पटेल याच्याशी सौदा झाला होता व 27 जुलै 2015 रोजी सौदा पावती झालेली होती. त्यापैकी सौदापावती बयाणा म्हणून इरफान याला 25 लाख रुपये रोख दिले होते. त्यासाठी नेहमीच्या अटी ठरवून त्यानंतर वकीलाकडे नोटरी करण्यात आली. यानंतर 10 सप्टेंबर 2015 रोजी पुन्हा याच ठिकाणी दुस:या प्लॉटचा 48 लाख 78 हजार रुपयात सौदा झाला. त्यासाठी 20 लाख रुपये रोख बयाणा म्हणून देण्यात आले. दोन्ही सौदापावतीसाठी 45 लाख रुपये रोख व इतर 25 लाख असे 70 लाख रुपये इरफानला देण्यात आले होते. या व्यवहारानंतर खरेदीखत करुन देण्यास टाळाटाळ केल्याने इरफान यानेही अन्य लोकांनाही अशाच प्रकारे फसविल्याचे लक्षात आले. त्यामुळे मोहम्मद मुसा यांनी इरफानकडे पैशाचा तगादा लावला असता साडे सहा लाख रुपये परत केले. त्यानंतर 50 लाखाचा धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश न वटल्याने मुसा यांनी न्यायालयात खासगी खटला दाखल केला. या खटल्यात न्यायालयाने काढलेल्या वारंटवर इरफान हा सोमवारी हजर झाला.सुरक्षेसाठी आलेले पोलीस गर्दी होताच झाले गायबजे पोलीस इरफानच्या सुरक्षेसाठी आले होते ते मागच्या दाराने गायब झाल्याने या पोलिसावरच संशय निर्माण झाला. पवार नावाचा एक अधिकारी प्रारंभी त्याच्या अवतीभोवती होता तसेच इरफानच्या वतीने हाच अधिकारी गुंतवणुकदारांशी चर्चा करीत होता. सरकारी शुल्क अदा करुन त्याने मुंबई येथून पोलीस आणल्याचे सांगण्यात येत होते, मात्र नंतर हे पोलीस गायब झाल्याने खरोखरच सरकारी शुल्क भरुन हे पोलीस आले होते की काही वेगळे कारण आहे याबाबत उलटसुलट चर्चा होती. जर सरकारी शुल्क भरुन बंदोबस्त घेतला असेल तर मग पोलीस गायब का झाले असा प्रश्न न्यायालय परिसरात उपस्थित होत होता.