जळगाव - शहरातील शनीपेठ परिसरात असलेल्या मनपा गंगुबाई शाळेसमोर असलेली एक जुनी इमारत गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने वेळीच बाहेर पडल्याने ७ लोक बचावले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या एका वृद्धेला परिसरातील तरुणांनी सुखरूप बाहेर काढल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पहाटे ४ वाजेच्या सुमारास इमारतीची माती पडायला सुरुवात झाल्याने नातू रोहित पाटील याला जाग आली. प्रसंगावधान राखत त्याने लागलीच कुटुंबीय रमेश पाटील, शोभा पाटील यांच्यासह दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या बहिणी सोनाली पाटील, गायत्री पाटील व एक ५ वर्षीय चिमुकली यांना बाहेर काढले. सर्व जिन्यावर येताच इमारत कोसळली. कोसळलेल्या इमारतीच्या खालील खोलीत कलाबाई पाटील (वय-७५) या वृद्धा राहत होत्या. वरील मजल्यावरील सर्वांना बाहेर काढल्यानंतर आजीला बाहेर काढण्याच्या आतच इमारत कोसळली.
छातीला मार लागल्याने वृद्धा हालचाल करू शकत नव्हत्या. परिसरातील तरुण कृणाल महाजन, रज्जाक सैय्यद, रोहित पाटील, इम्रान खान, वाहिद खान, वसीम खान, शाहिद खान यांच्यासह मनपा अग्निशमन दलाचे अधिकारी शशिकांत बारी, कर्मचारी संतोष तायडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, प्रदीप धनगर, सरदार पाटील, जगदीश साळुंखे, रवींद्र बोरसे, सोपान जाधव, पन्नालाल सोनवणे, नासिर शौकत अली, नितीन बारी आदींनी बचावकार्यात सहभाग घेत वृद्धेची सुखरूप सुटका केली.