पारोळा : तालुक्यातील पळासखेडे सिम येथील खडकी नाल्याला पूर आल्याने नाना कोंडाजी पाटील यांची बैलगाडी वाहून गेली. सोबत जुंपलेला एक बैल दगावला. बैलगाडीतील लोक ग्रामस्थांच्या मदतीने बचावल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजता घडली.पळासखेडे येथील शेतकरी नानाजी कोंडू पाटील हे शेतात मुसळधार पाऊस पडत असल्याने बैलगाडी घेऊन गावाकडे येत होते. दरम्यान, खडकी नाल्याला मोठा पूर आल्यामुळे ते पाणी गाड रस्त्यावर आले होते. त्या पाण्याच्या जोराने बैलगाडी वाहू लागली. त्यात एका बैलाचे ज्योत तुटल्यामुळे तो बाहेर निघाला. मात्र दुसरा बैल गाडीसह वाहून जाऊन दगावला.शेतकरी नानाजी पाटील यांना ज्ञानेश्वर उत्तम पाटील यांनी पाण्यात उडी घेऊन वाचविले. या परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने सर्व नदी, नाले आसंडून वाहत असताना सोनू तानाजी पाटील, मनोहर शेनफडू पाटील, दयाराम डोंगर पाटील, दिलीप भीमराव पाटील, अजाब तानाजी पाटील यासह आदी शेतक-्यांच्या शेतातील पिके वाहून गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.लोणी-बाहुटे येथील तलावही बुधवारी झालेल्या पावसाने १०० टक्के भरला आहे. म्हसवे तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू असून तोेही काही तासांमध्ये भरेल, अशी स्थिती होती.