एकाच दिवशी तीन दुचाकी चोरी : अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून उस्मानिया पार्कमधून दोन तर जिल्हा रुग्णालय परिसरातून एक दुचाकी लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर व जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी चोरीचा पहिला गुन्हा हा शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल करण्यात आला आहे. शेख मोहम्मद रफिक मोहम्मद हे उस्मानिया पार्क परिसरात वास्तव्यास आहे. त्यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच.१९.डीई.९१६३) ही मंगळवारी रात्री घराजवळ उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ती मध्यरात्री चोरून नेली. बुधवारी पहाटे ५.३० वाजता शेख यांना जाग आल्यानंतर त्यांना घराबाहेर दुचाकी दिसून आली नाही. तसेच त्यांच्या घराजवळून एमएच. १९. सीई. ४५५० क्रमांकाची दुचाकीसुद्धा चोरट्यांनी गायब केली होती. अखेर गुरुवारी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसरा गुन्हा हा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. शिरसोली नाका परिसरातील रहिवासी चंद्रकांत कृष्णा बागुल यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच. १९ बीआर. ५८५५) ही बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. याप्रकरणी बागुल यांच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.