पारोळा : येथील लोहारगल्लीत भरवस्तीत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून १० लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३० जूनला मध्यरात्री घडली.येथील लोहार गल्लीतील रहिवाशी महारू बळीराम चौधरी हे २५ जून रोजी रात्री कुटुंब व नातेवाइकांसह तिरुपती येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यांच्या कुलूपबंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सर्व कापटांची कुलुपे तोडून साहित्य अस्ताव्यस्त केले. ठिकठिकाणी ठेवलेले २५ तोळे सोन्याचे दागिने व एक ते सव्वा लाख रुपये रोख रक्कम असा अंदाजे १० लाखांचा ऐवज चोरून चोरटे फरार झाले.सकाळी बंद असलेले घर उघडे दिसल्यावर गल्लीतील मुलांनी महारू चौधरी यांच्या वहिनी भारती राजेंद्र चौधरी यांना चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते. कपाटे तोडलेली होती. याबाबत त्यांनी तत्काळ पारोळा पोलीस ठाण्यात संपर्क करून चोरी झाल्याची माहिती दिली. पारोळा पोलिस उपनिरीक्षक अजितसिंग देवरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील साळुंखे, ईश्वर भोई यांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. यावेळी जळगाव येथून श्वान पथक तसेच हातांचे ठसे घेणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथक मात्र घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या आझाद चौकापर्यंत जाऊन घुसमळत राहिले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
पारोळा येथे घरफोडी, १० लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 8:28 PM