जळगाव : मुलावर दवाखान्यात सुरु असलेल्या उपचाराचे बील भरण्यासाठी उसनवारीने आणलेले ५० हजार रुपये चोरट्यांनी खिडकीतून हात टाकून लांबविल्याची घटना बुधवारी पिंप्राळा येथील त्रिमुर्ती हौसिंग सोसायटीत घडली. त्याशिवाय सेंट्रल बॅँक कॉलनीतूनही पाच हजाराची रोकड चोरट्यांनी लांबविली आहे. तिसऱ्या घटनेत मोबाईल लांबविण्यात आले या तिन्ही घटना रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्या आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश रवींद्र बारी (४५) हे पिंप्राळा परिसरातील भवानी मंदिराच्या पाठीमागे त्रिमुर्ती हौसिंग सोसायटीत कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचा बारा वर्षीय मुलगा आजारी आहे. त्याच्यावर औषधोपचार सुरु असून दवाखान्याचे बील भरण्यासाठी बारी यांनी जवळच्या नातेवाईकापासून ५० हजार रुपये उसनवारीने आणले होते. त्यांनी ही रक्कम रात्री पॅँटच्या खिशात ठेवलीहोती.रात्री दीड वाजेच्या सुमारास चोरट्याने खिडकीतून घरात प्रवेश केला. खुंटीला लावलेली बारी यांची पॅँट तसेच दोन मोबाईल उचलून चोरटा घराबाहेर पडला. काही अंतरावर गेल्यानंतर पॅँटमधील रोकड काढून चोरटयाने पॅँट फेकून धूम ठोकली. बुधवारी सकाळी बारी यांना मोबाईल दिसले नाहीत. तर खुंटीला लावलेली पॅँटही आढळून आली नाही.
दवाखान्याच्या बिलाच्या रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:58 PM