लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे शाळेतील शिपायाच्या घरी भरदिवसा झालेल्या घरफोडीत कपाटात ठेवलेले अडीच ग्रॅमचे सुमारे साडेबारा हजार किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना १० रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, कुऱ्हे पानातील येथे माध्यमिक शाळेमध्ये शिपाई पदावर कार्यरत असलेले पुंडलिक संपत सपकाळे (५९) व त्यांची पत्नी अंगणवाडी सेविका लताबाई सपकाळे हे सकाळी साडेदहा वाजता आपापल्या कर्तव्यावर जाण्यासाठी घराला कुलूप लावून गेले.
त्यानंतर लताबाई या सकाळी साडेअकराच्या जवळपास घरी आल्या. त्यांना घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडा दिसला. तसेच लोखंडी कपाटातील तिजोरीतून तुटलेला व त्यातील सामान पलंगावर पडलेले दिसले. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
घराच्या मागील भिंतीवरून उडी मारून मागील दरवाजाचा कडी तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील गोदरेजच्या कपाटातील तिजोरीमध्ये ठेवलेले अडीच ग्रॅम वजनाचे कानातील टोंगल अंदाजे १२ हजार ५०० किमतीचे अज्ञात चोरांनी लांबविल्याची खात्री पटली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार युनूस शेख करीत आहेत.