जळगाव : बळीराम पेठ भागातील दोन दुकाने आणि एका घरात चोरी केल्याचा गुन्हा शहर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. त्यातील दोन आरोपींना बुधवारी (दि. ३०) जळगाव शहर पोलिसांनी अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. हे तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत.
बळीराम पेठ भागातील देवकर कॉम्प्लेक्स येथील दोन दुकाने या तिन्ही आरोपींनी २६ डिसेंबरच्या रात्री फोडली. त्यातून नऊ हजार रुपये रोख, हिशोबाची कागदपत्रे असलेली बॅग, प्रदीप कटारिया यांच्या बाबा गारमेंट्स या दुकानातील ६०० रुपये रोख, त्यासोबतच परिसरातील रहिवासी प्रदीप देशमुख यांच्या घरातील गव्हाची गोणी, आणि १५ हजार रुपये किमतीचे होम थिएटर चोरीस गेले होते.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी फरार आहे. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल उमेश भांडारकर करत आहेत.
उस्मानिया पार्क परिसरातही घरफोडीची कबुली
उस्मानिया पार्क परिसरातही या आरोपींनी एक घर फोडले असल्याची कबुली दिली होती. हे घर त्यांनी टॉमी लावून फोडल्याचेही या आरोपींनी कबुली दिली आहे. त्या घरातून आरोपींनी एलईडी टीव्ही लंपास केला होता. दोन्ही आरोपींना वासुदेव सोनवणे, उमेश भांडारकर, अक्रम शेख, रतन गिते, विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, नासीर शेख यांच्या पथकाने अटक केली.