लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दिवसा कपडे इस्त्रीचे काम करून रात्री घरफोड्या करणाऱ्या एकाच्या पारोळ्यातून मुसक्या आवळण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. कपिल दिलीप वाघ (रा़ पेंढारपुरा, पारोळा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून, त्याच्याजवळून पंधरा हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
पारोळा तालुक्यातील वाढत्या घरफोडींचे प्रमाण लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे विशेष पथक तयार करून पारोळ्याला पाठविण्यात आले होते. गेल्या एक महिन्यापासून पथक पारोळ्यात चोरट्याचा शोध घेत होते. त्यातच एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांना पारोळा पंचायत समितीजवळील रूद्र लाँड्रीमध्ये कपडे इस्त्री करणारा कपिल वाघ हा तरुण गावात इस्त्रीकरिता कपडे ने-आण करीत असताना घरांची पाहणी करून बंद घर रात्रीच्यावेळी फोडून चोरी करीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर शनिवारी कपिल वाघ याला पारोळ्यातून सापळा रचून एलसीबीच्या पथकाने अटक केली. त्याच्याजवळून पंधरा हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून, त्याने दोन घरफोड्यांची कबुली दिली आहे. ही कारवाई सुनील दामोदरे, जयंत चौधरी दीपक पाटील, प्रमोद लाडवंजारी, नंदलाल पाटील, किरण धनगर, भगवान पाटील, सचिन महाजन, दीपक चौधरी, अशोक पाटील आदींनी केली.