जळगाव : बहिणीकडे गेलेल्या कोकिळा लक्ष्मण महाले या वृद्ध महिलेच्या जोशी पेठेतील घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून ३५ हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोशी पेठेतील भोई गल्लीत कोकिळा महाले (६०) या आईसोबत राहतात. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घराला कुलूप लावून त्या आईसह देवीदास कॉलनीतील बहीण कल्पना बोरसे यांच्याकडे गेल्या होत्या. हीच संधी साधत चोरट्यांनी घरातून ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
तुम्ही घराला कुलूप लावले नाही का?
७ जानवोरीला दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास शेजारी राहत असलेल्या रंजना महाले यांना कोकिळा महाले यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी लागलीच कोकिळा यांना संपर्क साधून तुम्ही घराला कुलूप लावले नाही का? अशी विचारणा केली. त्यामुळे घरात चोरी संशय आल्याने महाले यांनी लागलीच घर गाठले.
तिजोरीतील पैसे लांबविले
कोकिळा महाले या गुरुवारी दुपारी घरी आल्यानंतर त्यांना घराच्या लोखंडी ग्रीलचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर वडिलोपार्जित तिजोरीत ठेवलेले ३० हजार रुपयांची रोकड व संजय गांधी निराधार योजनेचे मिळालेल्या ५ हजारांची रक्कम असे एकूण ३५ हजार रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले. तर घरातील संपूर्ण सामान अस्ताव्यस्त फेकल्याचेही आढळून आले. अखेर रात्री त्यांनी शनिपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार रघुनाथ महाजन करीत आहे.