जळगाव : तालुक्यातील नंदगाव येथील शरद भास्कर धनगर यांच्याकडील घरफोडी प्रकरणी मेव्हुणा व शालकाच्या मुसक्या आवळण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. दोघांकडून तब्बल १० लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले असून शेख नाजीम शेख रशिद (२८,रा. मलिक नगर) व शेख अरबाज शेख महेमुद (२०, रा. अक्सानगर) असे अटक केलेल्या मेव्हुणा-शालकाचे नाव आहे.
काय होती घटना
४ डिसेंबर २०२० रोजी नंदगाव येथील शरद धनगर यांच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या समोरील ओट्याखाली ठेवलेली चावीच्या सहाय्याने दरवाजा उघडून चोरट्यांनी लोखंडी कपाटातून पंचवीस हजार रूपये किंमतीचे दागिने व पंचवीस हजार रूपये रोख चोरून नेले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अडीच महिन्यांपासून चोरट्यांच्या शोधार्थ
जिल्ह्यातील घरफोडी उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी एलसीबीचे पथके स्थापन करून चोरट्यांच्या शोधार्थ पाठविले होते. दरम्यान, शेख नाजीम शेख रशिद हा अट्टल घरफोड्या गेल्या काही दिवसांपासून जळगाव-मालेगाव ये-जा करीत होता. दरम्यान, त्याने काही ठिकाणी चोरी केल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यातच तो व त्याचा शालक शेख अरबाज हे दोन दिवसांपूर्वी अजिंठा चौफुलीजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एलसीबीच्या पथकाने लागलीच अजिंठा चौफुली गाठत दोघांना ताब्यात घेतले.
घरफोडीची कबूली
अट्टल घरफोडी करणारे मेहुणा-शालकाची कसून चौकशी करीत खाक्या दाखविताच त्यांनी नंदगाव येथे चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, शेख नाजीम याने आणखी काही ठिकाणी घरफोड्या केल्या असून त्याचा तपास पोलीस करीत आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
मित्राच्या गॅरेजमध्ये लपविले दागिने
नाजीम व अरबाज यांची कसून चौकशी केल्यानंतर नाजीम याने त्याच्या घरातून दागिने काढून दिले़ तर काही दागिने कालंका माता चौफुली येथील मित्राच्या गॅरेज येथे लपविल्याचे त्याने सांगितले. तेथूनही पोलिसांनी दागिने जप्त केले आहे. तब्बल १० लाख रूपये किंमतीचे दागिने हस्तगत झाले असल्यामुळे आणखी काही ठिकाणी नाजीम याने डल्ला मारल्याचे समोर आले आहे.
जळगावात आला की करतो मटन विक्रीचा व्यवसाय
नाजीम हा जळगावात आला की मटन विक्री किंवा हातगाडी चालविण्याचे काम करतो. या दरम्यानात तो घरफोड्या करतो. तसेच तो काही दिवसांपासून मालेगावात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक रवींद्र गिरासे, अशोक महाजन, रवी नरवाडे, राजेश मेढे, सुनील दामोदरे, संजय हिवरकर, संदीप पाटील, महेश महाजन, प्रवीण मांडोळे यांनी केली आहे.