जळगाव : सैन्य दलात जवान असलेल्या निखिल महाजन यांचे संपूर्ण कुटूंब कामानिमित्ताने मुंबईला गेले अन् त्याच दिवशी रात्री चोरट्यांनी घर फोडून २ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना तळेले कॉलनीत घडली. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सैन्यात असलेले निखील महाजन यांचे कुटूंब तळेले कॉलनीत वास्तव्याला आहे. पत्नी हेमांगी, दीर अक्षय महाजन व आई असे सध्या या घरात वास्तव्याला आहे. महाजन कुटूंब ४ जुलै रोजी सकाळी मुंबईला गेले होते. त्याच दिवशी रात्री चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात व पेटीत ठेवलेली १ लाख १० हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची पोत, ३० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३ हजार रुपये किमतीचे एक ग्रॅमचे लहान बाळाचे सोन्याचे पताका, आणखी एक ३० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, १८ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅमचे सोन्याचे कानातील अभूषण, २ ग्रॅम वजनाचे कानातील अभूषण व ६० हजार रुपये रोख असा २ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार ५ जुलै रोजी सकाळी उघडकीस आला. ही घटना समजताच महाजन कुटूंबाने जळगाव गाठले. शनी पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार भा.न्या.स.कलम ३३१ (४)ल ३०५(ए) गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक नितीन पाटील करीत आहेत.