दोन्ही ठिकाणी प्रत्येकी १७ हजारांचा ऐवज लंपास : चोरटे सीसीटीव्हीत कैद
जळगाव : अक्षय तृतीयेनिमित्त घरे बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी शहरात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी केल्या. चैत्रबन कॉलनीत नारायण धर्मा पाटील यांच्या घरातून ८ हजार रुपयांची रोकड तर पिंप्राळा हुडकोत समाधान बाळू पाटील यांच्या घरातून १७ हजारांची रोकड लांबविण्यात आलेली आहे दरम्यान, समाधान पाटील यांच्या घरात चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान पाटील हा तरुण पिंप्राळा हुडकोत शासकीय रुग्णालयाच्या मागील बाजूस आई पत्नी व मुलगी या कुटुंबासह वास्तव्यास आहे. घरातच ओम साई नावाने किराणा दुकान आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागतो. १३ एप्रिल रोजी समाधान पाटील हा परिवारासह त्याच्या बहिणीकडे सोमेश्वर कांतीपूर, बारामती याठिकाणी गेला होता. शनिवारी सकाळी साडेसात वाजता जळगावात परतला. यावेळी घराचे कुलूप व कडी कोयंडा तुटलेले दिसले. घरात तसेच किराणा दुकानातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. कपाटातील १७ हजारांची रोकड तसेच किराणा दुकानातील इतर किरकोळ वस्तू चोरीस गेल्याचे दिसून आले. चोरट्यांनी घरात सर्वत्र गुटखा खावून थुंकलेले होते, परततांना सीसीटीव्ही कॅमेराही फोडला. मात्र कॅमेरा फोडण्यापूर्वी घरात प्रवेश करतांना तिघे चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. चोरीची झाल्याची खात्री झाल्यावर समाधान याने रामानंदनगर पोलिसात तक्रारीसाठी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना दाखविले.
चैत्रबन कॉलनीत अक्षय तृतीयेला घरफोडी
चैत्रबन कॉलनीत नारायण धर्मा पाटील (६८) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८ हजार रुपये हजार रुपये व ९ हजार रुपयांचे चांदीचे भांडे असा १७ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नारायण पाटील हे खासगी कंपनीत नोकरीला आहेत. पत्नी चेतना, मुलगा योगेंद्र व सचिन अशांसह ते चैत्रबन काॅलनीत वास्तव्याला आहेत. अक्षयतृतीयेसाठी ९ मे रोजी सकाळी नऊ वाजता ते पातोंडी, ता. रावेर या मूळ गावी गेले होते. गावाला जाताना घराची चावी मुलाचा मित्र अभिनव चौधरी याच्याकडे ठेवली होती. घरातील फिश टँकमधील माशांना खाद्य टाकण्यासाठी अभिनव शुक्रवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या घरी गेला असता मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. अभिनव याने ही माहिती पाटील यांना कळवली. हे कुटुंब शनिवारी घरी आले असता कपाटात ठेवलेले आठ हजार रुपये व चांदीची भांडी दिसून आली नाहीत. घरफोडी झाल्याची खात्री झाल्यानंतर पाटील यांनी शनिवारी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.