कजगाव, ता. भडगाव : गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजेच ११ मे रोजी सुरू झालेले चोरीचे सत्र थांबता थांबेना. ११ मे ते ४ जुलैदरम्यान घरफोड्या, रस्ता लूट, गुरेचोरी, दुचाकी चोऱ्या अशा चोरीच्या घटना एकामागून एक घडत असतानाच ४ जुलै रोजी दिवसाढवळ्या अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीच्या तीन बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. सततच्या होत असलेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांत, पशुधन मालक, वाहनधारकांत घबराट पसरली आहे.
११ मे रोजी एकाच रात्रीत चक्क तीन घरे फोडत लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला होता. यानंतर चोरीची मालिका सुरू झाली नि एकामागून एक चोरी करत थेट पोलिसांनाच आव्हान देत चोरट्यांनी चोरीचा सपाटाच सुरू केला आहे. ४ जुलै रोजी भर दुपारी गजबजलेल्या परिसरातून सयाबाई दौलत भोई यांच्या दोन बकऱ्या व छायाबाई संजय भोई यांची एक बकरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या घटनेमुळे पशुधन मालकांमध्ये घबराट पसरली आहे.
याअगोदरदेखील घरफोड्या, रस्ता लूट, वाहनचोरी, पशुधन चोरी अशा घटना झाल्या आहेत. यात मोटारसायकलच्या चोऱ्या जास्त प्रमाणात झाल्या आहेत. ११ मेपासून सुरू झालेली ही चोरीची मालिका थांबवण्यात पोलिसांना यश आलेले नाही. उलट चोरटे ‘ब्रेक के बाद’ चोरी करत पोलिसांनाच आव्हान देत आहेत.
११ मे रोजी अमावास्येच्या रात्री एकाच रात्री तीन घरे फोडत अज्ञात चोरट्यांनी चोऱ्यांचा शुभारंभ केला. तो आजदेखील कायम आहे. चोरांनी पोलिसांना आव्हान देत एकामागून एक चोरीचा सपाटा कायम ठेवला आहे. चोर सुसाट झाले आहेत तर पोलीस तपास करत आहेत. मात्र अद्याप एकाही चोरीचा तपास लावण्यात यश आलेले नसल्याने चोरट्यांची हिंमत वाढत आहे.
तपास लागेना, चोर सुसाट
गेल्या दोन महिन्यांपासून अज्ञात चोरट्यांनी कहर केला आहे. ‘ब्रेक के बाद’ पद्धतीने चोरांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. मात्र पोलिसांना तपास लावण्यात अद्याप यश आलेले नाही. चोरट्यांच्या धुमाकुळामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.