फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेडिमेड कापड विक्रीचा व्यवसाय करणारे नंदू मधुकर सोनार (वय ४५) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील पंधरा हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील गेंदालाल मिल येथील सावित्री बिल्डिंगमध्ये नंदू मधुकर सोनार हे कुटुंबीयांसह राहतात. १२ मे रोजी चुलत काका रघुनाथ सोनार यांचे निधन झाल्याने ते बोराडी, ता.शिरपूर येथे गेले होते. तेथून ते २८ घरी परतले असता सोनार यांना त्यांच्या जिन्याचे तसेच घराचे कुलूप कडीकोंयडा तोडलेले दिसून आले. घरात पाहणी केली असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तुटलेले होते. तसेच त्यातील पंधरा हजारांची रोकड गायब असल्याचे लक्षात आले. चोरीची खात्री झाल्यावर नंदू सोनार यांनी शनिवारी जळगाव शहर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली . या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार उमेश भांडारकर करीत आहेत.