अमळनेर : तालुक्यातील सावखेडा, रुंधाटी व मठगव्हान येथे चोरट्यांनी बंद घरांमध्ये धाडसी घरफोड्या करून १० लाखांचा ऐवज लंपास केला. या घटना २७ रोजी पहाटे घडल्या. घटनास्थळी पोलीस अधिक्षकांनी भेट देऊन श्वानपथक मागवण्यात आले होते. दोन मोटरसायकलने चोरटे फरार झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे.याबाबत माहिती अशी, सावखेडा येथे गुलाबराव दगा कदम यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील व डब्यातील ३५ ग्राम वजनाच्या एक लाख १२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, २ लाख ५६ हजारांची ८ तोळ्यांची माळ, २ लाख ७५ हजार रुपयांच्या ९ तोळ्यांच्या ८ अंगठ्या, ६४ हजार रुपयांची २ तोळे पोत, १६ हजार रुपयांचे ५ ग्राम कानातले, ७ हजार रोख असा एकूण ८ लाख १० हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला. गुलाबराव यांचा एक मुलगा चोपडा येथे व एक अमळनेर येथे राहत असून ते औषधोपंचारासाठी आठ दिवसांपासून अमळनेरला आले होते. त्याचप्रमाणे रुंधाटी येथील दिलीप भाऊराव पाटील हे देखील धुळ्याला दवाखान्यात अॅडमिट होते. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० हजार रोख, सुमारे सव्वा लाखाची साडे तीन तोळ्यांची मंगलपोत व १० हजार रुपयांची २३ भार चांदी असा दीड लाखाचा माल चोरून नेला. मठगव्हान येथे जितेंद्र देवाजी पवार यांचे घर फोडून कपाटातील ४ हजार रुपये लंपास करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र अमळनेरला राहणारे जितेंद्र पवार नेमके त्याचवेळी घरी परतल्यान पुढील चोरी टळली. आरडाओरड सुरू केली असता ग्रामस्थ जागे होऊन धावून आले. त्यावेळी चोरट्यांनी हातातील गिलोरने दगडफेक केली. त्यात हंसराज पवार व पप्पू पवार जखमी झाले. सहा चोरटे दोन मोटरसायकलींद्वारे फरार झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, डीवायएसपी राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माळी, श्वानपथक प्रमुख शेषराव राठोड, पोलीस नाईक शरद पाटील यांनी भेट दिली. श्वान पथकाने आरोपी मुंगसे सावखेडा मार्गे पळाल्याचे दर्शवले. मुंगसे ते सावखेडा दरम्यान आरोपीनी रस्त्यात चादर टाकून जेवण केल्याचा पुरावा आढळून आला. तेथे आढळलेल्या पिशवीवर धार, मध्यप्रदेश असा उल्लेख सापडल्याने आरोपी माध्यप्रदेशातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यात तीन गावात घरफोडी, दहा लाखांचा ऐवज लंपास करून चोरटे पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 5:26 PM