जळगाव - राज्यातील सत्तासंघर्ष अधिकच चिघळत चालला आहे. या साऱ्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेच्या नेत्यांकडून बंडखोरांवर कठोर टीका केल्या जात आहेत. त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसून येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केल्याने गुलाबराव पाटलांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोमवारी गुलाबरावांच्या पाळधी गावी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांवर खालच्या शब्दांत टीका केली होती. गुलाबराव पाटील हे टपरी चालवत होते, त्यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्री केलं, आता त्यांनीच बंडखोरी केली. त्यांना परत टपरी चालवायला लावू, असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. राऊतांच्या याच वक्तव्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या गावात सर्मथकांनी संजय राऊत यांच्या विरोधात मोर्चा काढून त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ पाळधी गावात ठिकठिकाणी बॅनरबाजीही करण्यात आली आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटलांचे समर्थक -
खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांची भावना दुखावली आहे. गुलाबराव पाटील हे तळागाळातील नेते असून सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा नेता असा त्यांचा प्रवास राहिला आहे. चार वेळेस ते जनतेतून निवडून आले असून, त्यांच्यावर टीका करणे चुकीचे आहे. संजय राऊत हे मागच्या दारातून खासदार झाले आहेत, अशा संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. संजय राऊत यांनी असे वक्तव्य केले, म्हणून याच विरोधात राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले, असे गुलाबराव पाटील समर्थकांनी सांगितलं.