लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या वीज कंपनीचा दहा एमव्हीएचा ट्रान्सफार्मर शुक्रवारी संध्याकाळी जळाल्याने दोन दिवसांपासून जी सेक्टरमधील २५० उद्योगांची चाके थांबली आहेत. यामध्ये एकेका उद्योगाचे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. नादुरुस्त झालेला ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यासाठी अजून १५ दिवस लागणार आहे, तर दुसरीकडे पर्यायी ट्रान्सफार्मरही उपलब्ध होत नसल्याने उद्योग सुरू होण्याबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान, शुक्रवारी पाचोरा येथून ट्रान्सफार्मर आणण्यासाठी वाहन गेले खरे; मात्र तेथे विरोध झाल्याने ट्रान्सफार्मर मिळू शकला नाही. अखेर आता चोपडा येथून ट्रान्सफार्मर आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र पावसाच्या सावटामुळे तो कधी बसू शकेल, याचीही शाश्वती नसल्याचे चित्र आहे.
औद्योगिक वसाहत परिसराला या भागात असलेल्या महावितरणच्या उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. यात जी सेक्टर भागात वीजपुरवठा करणारा १० एमव्हीएचा ट्रान्सफार्मर जळाल्याने २५० उद्योगांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
उद्योजकांना मोठा फटका
लॉकडाऊनच्या काळात अनेक दिवस उद्योग बंद राहिल्याने उद्योजकांना मोठा फटका सहन करावा लागला. त्यात आता मजूर परतून उद्योग सुरळीत सुरू होत नाही तोच आता खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जाण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. वीजपुरवठाच नसल्याने उद्योग बंद राहून एकेका उद्योगांची दररोजची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. अशा एकूण २५० उद्योजकांचा विचार केला तर दररोज करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शिवाय कामगारांना हातावर हात धरू बसावे लागत आहे.
ट्रान्सफार्मर आणण्यास केला विरोध
औद्योगिक वसाहत परिसरातील हा ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर त्याच क्षमतेचा ट्रान्सफार्मर उपलब्ध व्हावा यासाठी त्याचा शोध घेण्यात आला. यात पाचोरा येथे अतिरिक्त (स्पेअर) ट्रान्सफार्मर उपलब्ध असल्याने तेथे शुक्रवारी रात्रीच क्रेन पाठविण्यात आली. तेथे हा ट्रान्सफार्मर काढला, मात्र याची माहिती मिळताच तेथील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे तेथून काढलेला ट्रान्सफार्मर अखेर पुन्हा तेथेच बसवावा लागला. हे प्रकरण आमदार किशोर पाटील यांच्यापर्यंत गेले. मात्र औद्योगिक वसाहतीसाठी हा ट्रान्सफार्मर मिळू शकला नाही. अखेर २० हजार रुपये भाडे देऊन पाठविण्यात आलेली क्रेनही रिकामीच परत आली.
दुरुस्तीसाठी लागणार १५ दिवस
नादुरुस्त झालेला ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यासाठी किमान १५ दिवस लागू शकतील. त्यानंतर हा ट्रान्सफार्मर येथे उपलब्ध होऊ शकणार आहे.
चोपडा येथून पर्यायी व्यवस्था; मात्र पाऊस थांबणे गरजेचे
पाचोरा येथून ट्रान्सफार्मर न मिळाल्याने जळगावात असलेला ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर चोपडा येथे पाठवून तेथून १० एमव्हीएचा ट्रान्सफार्मर उपलब्ध केला जाणार आहे. चोपडा येथून हा ट्रान्सफार्मर मिळाल्यानंतर तो रविवारी बसविण्यात येणार असून, त्यानंतर लगेच वीजपुरवठा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्यथा सोमवारी (दि.१४) वीजपुरवठा सुरळीत होऊन त्या दिवशीच हे उद्योग सुरू होण्याची शक्यता आहे. ट्रान्सफार्मर बसविताना तो उघडून बसवावा लागतो. त्यामुळे रविवारी पाऊस असल्यास ट्रान्सफार्मर उघडले तर त्यात पाणी जाऊन तोदेखील नादुरुस्त होऊ शकतो. त्यामुळे वीजपुरवठा कधी सुरळीत होणार या विषयी अनिश्चितताच असल्याचे चित्र आहे.
अशा प्रकारची अचानक नादुरुस्ती झाल्यास महावितरण कंपनीने पर्यायी व्यवस्था ठेवणे गरजेचे आहे. औद्योगिक ग्राहक नियमित वीजबिल भरणा करण्यासह सर्वाधिक महसूलही देते. त्यामुळे त्यांच्यासाठी अत्यावश्यक बाब म्हणून पर्यायी उपायोजना ठेवल्यास होणारे नुकसान टाळता येऊ शकते. आता या बंदमुळे एकेका उद्योगाची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. लवकरात लवकर उपाययोजना होणे आवश्यक आहे.
- किशोर ढाके, अध्यक्ष, लघुउद्योग भारती.
१० एमव्हीएचा ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाला आहे. त्याच क्षमतेचा ट्रान्सफार्मर उपलब्ध करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी चोपडा येथून ट्रान्सफार्मर आणण्यात येत आहे. रविवारी वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- बी.एन. चौधरी, प्रभारी कार्यकारी अभियंता