जळगाव : पिंप्राळ्यातील संत मिराबाई नगरात जगदीश मधुकर कुळकर्णी (३४) यांच्या मालकीची दुचाकी एका माथेफिरुने पेटविल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जगदीश कुळकर्णी हे पुजापाठ करून उदरनिर्वाह करतात. सोमवारी सायंकाळी त्यांनी नेहमी प्रमाणे दुचाकी (क्र. एम.एच. १९ बी.टी. ३०९९) ही घरासमोर पार्कींग केलेली होती. रात्री एक वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दुचाकीला पेटवून दिले. आवाज झाल्यानंतर कुळकर्णी यांना जाग आली. त्यांनी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले असता दुचाकीला आग लागल्याचे चित्र दिसले. बोरींग सुरू करून आग विझविली. गस्तीवर असलेल्या पोकॉ. ललीत भदाणे व हिरामण सोनवणे यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तपास हेडकॉन्सटेबल सुधाकर शिंदे हे करीत आहेत.आधीच्या घटनांमधील दुचाकी जाळणारे मोकाटशिवाजीनगर व कांचननगरात २४ डिसेंबरच्या मध्यरात्री दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला होता. यात शिवाजीनगर येथील सलीम मजीद खान व त्यांचे भाऊ यांच्या दोघांच्या दुचाकी जाळल्या होत्या. याचदिवशी रात्री कांचननगरात ईश्वर नारायण राजपूत व त्यांचा मुलगा विक्की राजपूत या दोघांच्या दुचाकी जाळल्या होत्या. याप्रकरणी शहर व शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे कांचननगरातील घटनेत संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत,असे असतांनाही हे आरोपी मोकाट आहेत.
जळगावात दुचाकी पेटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 1:00 PM
पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
ठळक मुद्दे बोरींग सुरू करून आग विझविली.