अमळनेर : पेपर देऊन परतत असतांना घडली घटना
अमळनेर, दि.27- दहावीचा पेपर देऊन तिघेजण मोटारसायकलने अमळनेरकडे येत असतांना, मोटारसायकल घसरली. त्याचवेळी मागून आलेल्या बसचा फटका बसल्याने, दहावीची विद्यार्थीनी जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दीड वाजेच्या सुमारास अमळनेर-चोपडा रस्त्यावरील गडखांब-देवळी दरम्यान घडली. ज्योती दशरथ मालकेकर (रा. नरडाणा) असे मयत विद्यार्थीनीचे नाव आहे.
ज्योती ही नरडाणा येथील रहिवाशी आहे. ती रोज भावासोबत अमळनेरला यायची. ती टाकरखेडा शाळेची विद्यार्थीनी होती. सोमवारी ती दहीवद केंद्रावर दहावीचा पेपर देण्यासाठी गेली होती. पेपर सुटल्यानंतर ती युसूफ मेहतर, नजिमा मेहतर यांच्यासोबत दुचाकीने अमळनेरकडे येत होती. गडखांब-देवळी दरम्यान मोटारसायकल घसरली. ते तिघे रस्त्याच्यालगत पडले. त्याचवेळी मागून येणा:या बसचा ज्योतीच्या डोक्याला जोरदार फटका बसला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बसमधून ढकलल्याची चर्चा
दरम्यान ज्योती ही बसने अमळनेरकडे येत असतांना तिला दोन मुलांनी खाली ढकलून दिल्याने, तिचा मृत्यू झाल्याची चर्चा होती.मात्र हा अपघात होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.