आगार व्यवस्थापकांची माहिती:
ग्रामीण भागातील फेऱ्या कमी करणार
जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांच घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शासनाच्या या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठीच जळगाव आगारातर्फे बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनातर्फे ३० एप्रिलपर्यंत राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध लागू केले आहेत. तर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या या निर्देशानुसार महामंडळाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेतील नागरिकांच्या सोयीसाठीच बसेस सोडण्याचे ठरवले आहे. या मध्ये सकाळच्या सत्रात बहुतांश नोकरदार वर्ग बाहेरगावी जात असल्याने, या वेळेत संबंधित गावांना बसेस सोडणार आहे. तसेच ग्रामीण भागातही दर तासाला वेळापत्रकाप्रमाणे बसेस न सोडता ठरावीक वेळेतच बसेस सोडण्यात येणार आहे. जर एखाद्या गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असेल आणि त्यातील अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची संख्या जास्त असल्यावरच बसेस सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, या संचारबंदीच्या काळात शासनाच्या सूचनांचे महामंडळातर्फे तंतोतंत पालन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो:
निर्जंतुक करूनच बाहेरगावी बस रवाना
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करूनच बाहेरगावी सोडण्यात येत असल्याचे आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले. तसेच चालक व वाचकांना मास्क असणाऱ्या प्रवाशांच बसेसमध्ये प्रवेश देण्याबाबत सूचना करण्यात आल्या असून, महामंडळातर्फे याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या पथकामार्फत विनामास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे बोरसे यांनी सांगितले.