आगार व्यवस्थापकांची माहिती: मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांठीही तात्काळ बस सुटणार
जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आगार प्रशासनातर्फे वाहतुकीच्या नियमामध्ये गुरुवारपासून बदल करण्यात आले असून, दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे बसेस न सोडता, आगारात प्रवासी असल्यावरच बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र, जवळच्या तालुक्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठी तत्काळ बसेस सोडण्यात येणार असल्याचेही बोरसे यांनी सांगितले.
शासनाने संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांनाच घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बाहेरील गावाहून जळगावकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी राहण्याची शक्यता आहे. तर जळगावहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या कमी राहणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता जळगाव आगारातर्फे गुरुवारपासून वेळापत्रकाप्रमाणे बसेस न सोडता, प्रवासी उपलब्ध झाल्यावरच बसेस सोडण्यात येणार आहेत. जर पुरेसे प्रवासी उपलब्ध झाले नाही, तर बसेसही सुटणार नाही. त्यामुळे वेळापत्रकाप्रमाणे जळगाव आगारातून धुळे, औरंगाबाद, नाशिक, पुणे, विरार, चाळीसगाव या ठिकाणी एकही बस रवाना होणार नाही. मात्र, अत्यावश्यक सेवेतील ग्रामीण, तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या ठिकाणी जाणारे नागरिक आले, तर त्यांच्यासाठी तत्काळ बसेस सोडण्यात येणार आहेत. शासनाच्या सूचनेनुसार ३० एप्रिलपर्यंत महामंडळाचे हे नियोजन कायम राहणार आहे.
इन्फो :
तर उत्पन्न अधिकच घटणार
संचारबंदीच्या या काळात महामंडळाची सेवा ८० टक्के बंदच राहण्याची शक्यता आहे. कारण, शासनाच्या सूचनेनुसार अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांच बाहेर फिरण्याची सक्ती असल्याने परिणामी प्रवासी संख्येवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सध्या कोरोना काळात येत असलेले साडेतीन ते चार लाखांपर्यंतचे उत्पन्न आता संचारबंदीच्या काळात अधिकच घटणार असल्याचा अंदाज आगार प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला.
इन्फो:
निर्जंतुक करूनच बाहेरगावी बस रवाना
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करूनच बाहेरगावी सोडण्यात येत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात सांगितले. तसेच चालक व वाहकांना मास्क असणाऱ्या प्रवाशांच बसेसमध्ये प्रवेश देण्याबाबत सूचना करण्यात आल्या असून, महामंडळातर्फे याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या पथकामार्फत विनामास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
इन्फो :
शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे याचा महामंडळाच्या प्रवासी संख्येवर परिणाम होणार असून, आगारात प्रवासी असल्यावरच बसेस सोडण्यात येतील. नेहमीप्रमाणे वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यात येणार नाहीत.मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठी तत्काळ बसेस सोडण्यात येतील.
प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार