जळगाव,दि.19-दाणाबाजारातील सिताराम शंकरलाल मणियार या फर्ममध्ये रोखपाल व कारकून असलेल्या मुकूंद ब्रिजलाल तोष्णीवाल (रा.मुंदडा नगर, जळगाव) याने चुकीच्या नोंदी घेऊन व्यवहारातील रक्कम बॅँकेत न भरता परस्पर हडप करुन 7 लाख 27 हजाराचा अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला.
विष्णुकांत सिताराम मणियार यांच्या मालकीची दाणाबाजारात सिताराम शंकरलाल मणियार या नावाची फर्म आहे. मुलगा हरगोविंद मणियार हे काम पाहत असलेले प्रथमेश पॉली प्रो.नावाचीही जिल्हा पेठमध्ये एक फर्म आहे. मुकूंद तोष्णीवाल हा त्यांच्याकडे 2010 ते 2016 या काळात रोखपाल व कारकून म्हणून काम पाहत होता.
दैनंदिन व्यवहाराचा लेखी हिशेब ठेवून ती रोख रक्कम वेगवेगळ्या बॅँकेत भरण्याची जबाबदारी तोष्णीवाल याच्याकडे सोपविली होती, मात्र त्याने 2 एप्रिल ते 3 सप्टेबर 2016 या काळात व्यवहाराच्या दप्तरी नोंदी घेतल्या परंतु ती रक्कम बॅँकेत भरलीच नाही.