लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : कोरोनाच्या सावटामुळे ग्रामीण भागात हातावर पोट भरणाऱ्या लहान व्यावसायिकांचे गेल्या काही दिवसांपासून खूप हाल झाले आहेत. मंदीमुळे आर्थिक आवक कमी झाल्याने अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आता कठीण झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे सगळीकडे काटेकोर पालन होत असताना किराणा, भाजीपाला, फळे विक्री तसेच चहा, नाश्त्याची हॉटेल्स, मोबाईल दुरूस्ती व इलेक्ट्रीक साहित्याची दुकाने, सलून, शिवणकाम, पान टपरी व लॉन्ड्री यासारखे अनेक लहान व्यवसाय मंदीची झळ सोसत आहेत. रोजगारासाठी शहरात जाण्याऐवजी गावातच पोटापाण्यासाठी धडपडणाऱ्या व्यावसायिकांची मोठी आर्थिक कोंडी त्यामुळे झाली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्याची स्थिती अजूनही चांगली असून, कोरोना बाधितांमध्येही ग्रामीण भागातील रूग्ण कमी आहेत. सोशल डिस्टंन्सिंगसह आरोग्याची काळजी घेतली जात असल्याने विरळ लोकवस्ती असलेल्या ग्रामीण भागात सध्यातरी चिंतेचे वातावरण दिसून आलेले नाही. शेतकरी व शेतमजूर नेहमीप्रमाणे शेतीकामांमध्ये व्यस्त आहेत. लहान व्यावसायिकांची मात्र हाल होत आहेत.
------------------------------------
पॅकेजमध्ये समाविष्ट करा
लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने उपासमारी सहन करणाऱ्या फेरीवाले व इतरांसाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. त्यातून ग्रामीण भागातील लहान व्यावसायिकांनाही मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.