भारतीय संस्कृतीमध्ये सूर्याला खूप महत्त्व दिले जाते. यावरून आपल्याला समजते की, प्राचीन काळी सुद्धा लोकांना सौर ऊर्जेचे महत्त्व समजले होते. ऊर्जेचा सर्वांत मोठा प्रथम व प्रमुख स्त्रोत्र म्हणजे सौर ऊर्जा. एका बाजूला शहरीकरणामुळे वाढलेली ऊर्जेची मागणी प्रदूषण, तापमानातील वाढ व वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे अपारंपरिक ऊर्जेची गरज भासत आहे. अपारंपरिक ऊर्जेमध्ये सर्वांत उपयोगी म्हणजे सौर ऊर्जा.
भारत देशाच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेतला तर बऱ्याच परिसरात अशी सूर्यकिरणे मिळतात, जिथे सौर ऊर्जा उत्पादनाला वाव आहे. सौर ऊर्जामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय केले जाऊ शकतात. सौर पॅनल बसवण्यासाठी खूप मोठी चालना मिळत आहे. मोठी घरे, बँक, कॉलेज, हौसिंग सोसायटी, हॉटेल, हॉस्टेल इ. ठिकाणी छतावरती मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असते. त्यामुळे हेच आपले ग्राहक बनू शकतात.
सौर ऊर्जा व्यवसायाची सुरुवात मुख्यत: दोन गोष्टींवर अवलंबून असते. ती म्हणजे आर्थिक क्षमता व तांत्रिक ज्ञान, सोलर व्यवसायाची सुरवात एजंट होण्यापासून ते डीलर शीप व डिस्ट्रिब्युटरशिप घेण्यापर्यंत होऊ शकते. मोठ्या सोलर कंपनीचे उत्पादन विक्री करून कमिशन तत्त्वावर सुद्धा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
दुसरा टप्पा म्हणजे अशाच कंपन्या आपल्याला फ्रेंचाईसी देतात. व्यवसाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सशक्त मार्केटिंग. ग्राहकांना जर सौर ऊर्जेचे महत्त्व पटवून देतां आले तर हा व्यवसाय नवीन उद्योजकांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. सोलर यंत्रणा उभी करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट असते त्याची तांत्रिक बाजू. सोलर पॅनलचे डिझाइन करणे त्याचे इस्टॉलेशन करणे असलेल्या जागेनुसार यंत्रणा बसवून घेणे यासाठी स्वत:ची टेक्निकल टीम असावी लागते. अशी एक टीम बनवून सुद्धा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.
सौर फार्मिंग एक नवी संकल्पना :
फळे, भाजी, कापसाची शेती, धान्याची शेती हे प्रकार आपण ऐकले आहेत. पण सूर्याची शेती केली जाऊ शकते. व त्यासाठी ओसाड व नापीक जमीन असली तरी चालते. ज्या जागेवर कशाचेही पीक घेता येत नाही त्या जागेवर सूर्याची शेती करता येऊ शकते. म्हणजेच ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते.
ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकतो. जेथे काही पिकत नाही व पाण्याची कमतरता आहे. अशा परिसरात ग्रामस्थांनी (शेतकऱ्यांनी) एकत्र येऊन छोट्या क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प उभे करायला हवे. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँका कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देतात.
इतक्या सर्व अनुकूल गोष्टी असताना उद्योग सहज उभा राहू शकतो. हा व्यवसाय पैसा मिळवून देत असला तरी याचा मुख्य हेतू हा स्वच्छ व शास्वत ऊर्जा निर्मितीसाठी चालना देणे आहे. व या व्यवसायातून आपण निसर्ग वाचवू शकतो. जर सर्वच लोकांनी सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून दैनंदिन जीवन जगण्यासाठी संकल्प केला तर काळानुरूप लोकांमध्ये बदल घडण्यास वेळ लागणार नाही.
अपारंपरिक ऊर्जेवर चालणारी उपकरणे यात मग सौर बंब, सौर कुलर, सौर कृषिपंप, सौर दिवे, सौर गृहप्रणाली इ.चा आपल्या वापरामध्ये आपण वापर करू शकतो व या गोष्टींचा पण व्यवसाय होऊ शकतो. त्यामुळे प्रदूषणाला पण आळा बसेल व संपूर्ण मानवीजीवन सुखमय होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्याला सौर ऊर्जेचे वरदान लाभलेले आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने वीजनिर्मितीसाठी सूर्यप्रकाशाचा वापर जगभरात होतो. त्यामुळे युवकांनी आपल्या शिक्षणाचा व बुद्धिमत्तेचा वापर करुन सौर ऊर्जेपासून उत्पादन बनविले तर खऱ्या अर्थाने आपल्या देशाची खूप प्रगती होऊ शकते.