जळगाव: नातेवाईकांकडे दशक्रिया विधीसाठी जात असताना वाळू वाहतूक करणाऱ्या विनाक्रमांकाच्या डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे कमलाकर मोतीराम पाटील (६४, रा. जळके, ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. हा अपघात रविवार, २८ जानेवारी रोजी पळासखेडा मिराचे गावाजवळ झाला. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला व काही वेळानंतर घटनास्थळावरून डंपरही पळवून नेण्यात आले.
जळगाव तालुक्यातील जळके येथील रहिवासी असलेले कमलाकर पाटील यांचे गावातच किराणा दुकान आहे. रविवारी त्यांच्या नातेवाईकांकडे दशक्रिया विधी असल्याने ते जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे दुचाकीने (क्र. एमएच १९, डीएन ७९१४) जात होते. पळासखेडा मिराचे गावाच्या थोडे पुढे गेल्यानंतर शाळेजवळ समोरून येणाऱ्या विना क्रमांकाच्या भरधाव वाळूच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात कमलाकर पाटील हे ठार झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या वेळी जळके गावातील नागरिक व नातेवाईकांनाही अपघाताविषयी माहिती दिली.
अपघातानंतर पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ तसेच नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. शवविच्छेदनानंतर दुपारी मयत पाटील यांच्यावर जळके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई असा परिवार आहे.अपघातानंतर डंपरचा चालक घटनास्थळावरून पसार झाला.