धुळे : जळगाव जिल्ह्यातील यावल येथून 15 जानेवारी रोजी चोरीस गेलेला ट्रक मंगळवारी धुळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिमंत जाधव यांच्या विशेष पथकाने शहरातील मुंबई - आग्रा महामार्गावरील अलहेरा हायस्कूलच्या पाठीमागे बेवारस स्थितीत उभा असताना पकडला.जळगाव जिल्ह्यातील यावल गावातील चोपडा रस्त्यावरून एमएच 19-ङोड 9243 क्रमांकाचा ट्रक 15 जानेवारी रोजी चोरीस गेला. यासंदर्भात यावल गावात बाबूजीपुरा येथे राहणारे ट्रक मालक इरफान खान बशारत खान यांनी यावल पोलीस स्टेशनला ट्रक चोरीची फिर्याद दाखल केली होती. मंगळवारी दुपारी धुळे शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांचे विशेष पथक हे मुंबई - आग्रा महामार्गावर गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अलहेरा हायस्कूलच्या पाठीमागे चोरीचा ट्रक उभा आहे. तेव्हा पथक त्या ठिकाणी पोहचले. तेथे एक विनानंबरचा ट्रक बेवारस स्थितीत उभा दिसला. पथकातील पोलिसांनी तो ट्रक ताब्यात घेऊन त्याचे इंजिन व चेचीस नंबरवरून त्याचा शोध घेतला. तेव्हा चोरीचा ट्रक हा यावल येथील असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. यावल पोलीस स्टेशनचे सदर गुन्ह्यातील तपासी अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक धनगर हे चोरीस गेलेला ट्रक हस्तगत करण्यासाठी धुळ्याकडे रवाना झाले आहे. चोरीचा ट्रक विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम मोरे, पोलीस नाईक पंकज चव्हाण, मोहमद मोबिन, सुनील पाथरवट, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश महाजन यांनी पकडला. हा ट्रक जप्त करून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात उभा करण्यात आला आहे.
यावलचा ट्रक धुळ्यात पकडला
By admin | Published: January 18, 2017 12:15 AM