लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात एकीकडे अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेच्या खोदकामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. त्यातच दुसरीकडे शासकीय कार्यालयांना फायबर ऑप्टीकल केबलने जोडण्याचे ‘महानेट’ चे काम एका खासगी कंपनीकडून सुरु आहे. मात्र, यासाठी संबधित कंपनीने मनपाकडे कोणताही आराखडा सादर केला नसून, परवानगी देखील घेतलेली नाही. त्यातच केबलसाठी खोदकाम करून, खांब उभे केले जात आहेत, याबाबतच्या तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर मनपाने संबधित कंपनीला नोटीस बजावून शहरात सुरु असलेले काम थांबविले आहे.
शहरात ‘महानेट प्रकल्पा’चे काम गेल्या काही महिन्यांपुर्वी हे सुरु झाले होते. याबाबत चार महिन्यांपुर्वी तत्कालीन स्थायी समिती सभापती ॲड.शुचिता हाडा यांनी देखील हा प्रकार मनपा प्रशानाच्या लक्षात आणून दिला होता. फायबर ऑप्टीकल केबलसाठी अनेक भागात रस्त्यांचे खोदकाम देखील करण्यात आले. तसेच या रस्त्यांची दुरुस्ती देखील महानेट ने केली नाही. पदाधिकाऱ्यांचा सूचनेनंतर देखील मनपाने या प्रकरणी कोणतेही लक्ष घातले नव्हते. मात्र, याबाबत आता नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मनपाने या प्रकरणी लक्ष घालून हे काम थांबविले आहे.
रस्त्यांचीही रुंदी झाली कमी
शहरात महानेट अंतर्गत आतापर्यंत ४३५ खांब उभारले आहेत. हे खांब उभारण्यासाठी मनपा प्रशासनाला देखील विश्वासात घेतले गेलेले नाही. हे खांब उभे केल्यामुळे अनेक कॉलनी भागातील रस्त्यांची रुंदी देखील कमी झाली आहे. तसेच खोदकामामुळे चांगले रस्ते देखील खराब होत आहेत. अमृतमुळे आधीच रस्त्यांची समस्या बिकट झाली आहे. त्यात या कामामुळे अधिकच अडचणींमध्य भर पडत आहे.
मनपाने थांबविले महानेटचे काम
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह त्यांच्या नियंत्रणातील अन्य कार्यालयांचा कारभार जलद व्हावा, म्हणून या कार्यालयांमध्ये उच्च क्षमेतची इंटनेट जोडणी करण्यासाठी महानेट प्रकल्प सुरु केला आहे. यासाठी शासनाने रिलायन्स कंपनीकडून हे काम करून घेतले जात आहे. शासनाचे काम असल्याने तशी परवानगी दिली आहे. मात्र, ज्या भागात हे काम सुरु केले जाते. त्या भागात काम सुरु होण्यापुर्वी मनपाकडे परवानगी घ्यावी लागते. तसेच कामाचा आराखडा मनपाकडे सादर करणे गरजेचे असते. मात्र, कंपनीने मनपाकडे आराखडा सादर केलेला नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने नोटीस बजावून हे काम थांबविले असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.