जळगाव : बांभोरी परिसरात असलेल्या जे.बी.प्लास्टो या कंपनीची केंद्रीय जीएसटीच्या पथकाने तपासणी केली असून काही कागदपत्रे नाशिक येथे तपासणीसाठी नेले आहे. या सोबतच जे.बी.प्लास्टोचे संचालक अविनाश जैन यांना विचारणा करण्यासाठी नाशिक येथे बोलविण्यात आले.
कंपनीत झालेले काही व्यवहार व कर चुकविल्याचा संशय असल्याने केंद्रीय जीएसटी पथक जळगावात धडकले. १५ ते २० जणांच्या पथकाने बांभोरी परिसरात असलेल्या जे.बी. प्लास्टो या कंपनीत जाऊन तपासणी केली. कंपनीत झालेले व्यवहार व प्रत्यक्षात भरलेला कर यामध्ये तफावत असल्याने ही तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संचालक नाशिकला
या पथकाने कंपनीतील काही कागदपत्रे सोबत नेले. त्यांची तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. कागदपत्रे नेल्यानंतर कंपनीचे संचालक अविनाश जैन यांनादेखील विचारणा करण्यासाठी नाशिक येथे बोलविण्यात आले होते. शनिवारी जैन हे नाशिक येथेच होते.
स्थानिक पातळीवर माहिती नाही
केंद्रीय जीएसटी पथक जळगावात आले. मात्र या विषयी जळगावातील जीएसटीच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली नव्हती. राज्य जीएसटी व केंद्रीय जीएसटी असे दोन विभाग असल्याने जळगावातील अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात न आल्याचे सांगण्यात आले. या तपासणीविषयी अधिकाऱ्यांनी गुप्तता पाळत कोणतीही माहिती दिली नाही.
—————-
केंद्रीय जीएसटीच्या पथकाने नियमित तपासणी केली. यात काहीही आक्षेपार्ह नाही. पथकाने सोबत काही कागदपत्रे घेतले. आपल्यालाही चर्चेसाठी बालविले होते. तपासाला आपण सर्व सहकार्य करीत आहोत.
- अविनाश जैन, संचालक, जे.बी. प्लास्टो.