लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १८ ते ४४ वयोगटांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला १ मे महाराष्ट्र दिनापासून सर्वत्र सुरुवात झाली. जिल्ह्यातही केवळ जळगाव शहरातील चार केंद्रांवर या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. मात्र, यात गोंधळाचे वातावरण अधिक होते. अनेकांना नोंदणी करूनही केंद्र उपलब्ध होत नसल्याने शिवाय ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोसबाबत निर्माण झालेला संभ्रम यामुळे आता कुणी लस देत का लस? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरातील शाहू महाराज रुग्णालय, नानबाई रुग्णालय, रेडक्रॉस रक्तपेढी, रोटरी भवन या चार केंद्रांवर केवळ १८ ते ४४ वयोगटांतील ज्यांनी ऑनलाइन नोंदणी करून केंद्र बुक करून घेतले आहेत. त्यांचे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे या केंद्रावर ४५ वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या नागरिकांची मात्र तारांबळ उडाली आहे. त्यामुळे या चारही केंद्रांवर हे गोंधळाचे वातावरण कायम होते. त्यात या केंद्रांनी बाहेर फलक लावला होता. शिवाय दुपारपर्यंत लस आलेली नसल्याने हा गोंधळ कायम होता. रोटरी भवनातील केंद्रावर गर्दी झाली हेाती. मात्र, लस दुपारी प्राप्त झाल्यानंतर लसीकरण सुरू झाले होते.
वयोगटानुसार गोंधळ वाढला
१ शहरातील शाहू महाराज रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, रेडक्रॉस रक्तपेढी व रोटरी भवन या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटांसाठी लसीकरण सुरू आहे. यात ज्यांनी ॲपवर नेांदणी केली आहे. ज्यांना केंद्र मिळाले आहे, त्यांचे लसीकरण होत आहे. शिवाय ज्या लसी राज्याकडून प्राप्त झाल्या आहेत. त्या केवळ या वयोगटासाठी वापरण्यात येत असून, केंद्राकडून आलेल्या लसींमध्ये ४५ वर्षे वयोगटावरील लोकांचा पहिला व दुसरा डोस दिला जात आहे.
२ शहरातील हे चार केंद्र सोडून उर्वरित जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. मात्र, त्या ठिकाणी सध्या लसी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर या चार केंद्रांवर कालांतराने सत्रानुसार लसीकरण होणार आहे.
दुसरा डोस मिळेना
२२ मार्च रोजी आम्ही रोटरी भवन येथे लस घेतली. लसीकरणाची प्रक्रिया सोपी आणि सुरळीत पार पडली होती.
आम्ही कोव्हॅक्सिन ही लस घेतली होती. मात्र, आता दुसरा डोस घेण्यासाठी ही लस उपलब्ध नसल्याचे केंद्रावरून सांगण्यात आले. आमचे वय बघता आम्हाला ही लस लवकर उपलब्ध करून द्यावी
-दगडू चौधरी, मीनाक्षी चौधरी
पहिल्या डोस मिळेना
लसीकरण नोंदणी करण्याबाबत संभ्रम खूप होता. नोंदणी केली मात्र, केंद्रच उपलब्ध होत नाहीय. आम्ही केंद्रावर जाऊन तपासणीही केली मात्र, केंद्र बुक झाल्यावरच तुम्हाला लस मिळेल मात्र, ॲपवर केंद्र कायमच फूल बुक दाखवते मग अशी लस मिळेल कधी
- शुभम काळे
फ्रंट लाइन वर्कर १८७७१
४५ वर्षांवरील नागरिक
पहिला डोस २,१०,५१०
दुसरा डोस ४१२९८
१८ ते ४४ वर्षीय पहिला डोस १७९०
कोट
१८ ते ४४ वयोगटांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. मात्र , ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. ज्यांनी केंद्र बुक करून तारीख मिळाली आहे, अशांनाच लस दिली जात आहे. त्यांनीच केंद्रावर यावे अन्यथा गर्दी करून नये. लसींच्या उपलब्धेतेनुसार ४५ वर्षांवरील नागरिकंचे लसीकरण नियमित सुरू राहणार आहे.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक