लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बहिणाबाई उद्यानाजवळ महामार्गाला लागून असलेल्या पत्र्याच्या टपरीला सोमवारी रात्री पावणे आठ वाजता अचानक आग लागली. सॅनिटायझरच्या कॅन ठेवलेल्या होत्या व तिथेच दिवा लावण्यात आलेला होता, त्यामुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यात टपरी जळून खाक झाली असून, ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या टपरीत रघुनाथ निकम यांचे कार्यालय होते. सोमवारी या भागात नेहमीसारखी वर्दळ सुरू होती, पावणे आठ वाजताच्या सुमारास अचानक टपरीला आग लागली. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अग्निशमन बंब बोलविला. फायरमन भगवान पाटील, वसंत कोळी, हिरामण बाविस्कर, सरदार पाटील व जगदीश साळुंखे यांनी आग विझविली. यात कोणालाही इजा झालेली नाही. आगीचे कारण समजू शकले नसले तरी या टपरीत सॅनिटायझरच्या कॅन ठेवलेल्या होत्या व तिथेच दिवा लावण्यात आलेला होता, त्यामुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.