परवाच्या दिवशी चाळीसगावात रंगगंध या संस्थेने आयोजित केलेला साहित्य अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम तीन दिवस होता. यानिमित्ताने महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरील काही ठिकाणाहून स्पर्धक आले होते. काही स्पर्धकांची राहण्याची व्यवस्था आम्ही त्यांच्या इच्छेनुसार हॉटेलमध्ये केली. आणि बाकी मंडळी मग आमच्यासारख्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडे घरी पाहुणे म्हणून राहिली.माझ्याकडे मुंबईहून आलेले पाच पाहुणे उतरले होते. त्यांचे आदरातिथ्य आम्ही केले. ती मंडळी फार खुश झाली. जाताना म्हणाली, ‘अहो, आमच्याकडे मुंबई-पुण्यात कोणी एक दिवस जरी एखादा पाहुणा आला तरी आम्हाला संकट पडते.’ त्यांचे म्हणणे खरे होते. कारण प्रत्येकाची घरे लहान. त्यातून घरातील दोघे कामावर जाणारे. मग आलेल्या पाहुण्यांची सरबराई कोण करेल?मला लहानपणीचे दिवस आठवले. तेव्हा आम्ही अगदी एका छोट्या खेड्यात राहात असू. तेव्हा आमच्याकडे जे पाहुणे येत ते कमीत कमी ८-१५ दिवस तरी रहात. ज्यांची आमच्या गावाला शेती होती, असे आमचे शहरातील नातेवाईक हंगामाच्या वेळी कधी कधी महिनाभरदेखील येऊन राहत. माझी आई त्यांचे आदरातिथ्य आनंदाने करायची. तिच्या चेहऱ्यावर कधीही आठ्या पडल्या नाहीत. कधी लग्नकार्य असले तर ८-१५ दिवस आधी एकमेकांच्या घरी जाऊन राहणे ही नेहमीचीच गोष्ट होती. पण आता मात्र काळ बदलला आहे.पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. नोकरीनिमित्ताने कुटुंबे लहान झाली आहेत. पण फक्त कुटुंबेच लहान झाली असे नाही. आमची मनेपण लहान झाली. पूर्वी घर लहान असले आणि त्या घरात चार माणसे राहत असली तरी पाचवा माणूस आला तर त्याच्यासाठी आनंदाने जागा असायची. कारण मनाची श्रीमंती मोठी होती. आता मात्र कदाचित घरांचे स्क्वेअर फूट वाढले असतील पण हृदयाचे स्क्वेअर फूट कमी होत चालले आहेत. एकमेकांवरचे प्रेम कमी होत चालले. माझे घर, माझी मुले, माझी बायको, माझा परिवार असा संकुचित परीघ होतो आहे. मी माझे पाहीन. बाकीच्या गोष्टींशी मला काही देणेघेणे नाही, अशी वृत्ती वाढीस लागली आहे. एकमेकांच्या सुखदु:खात धावून जाण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. घराभोवती जसे कंपाऊंड आम्ही घालतो तसेच मनाभोवती पण घालायला लागलो काय असे वाटायला लागले आहे. निरपेक्ष वृत्तीने इतरांसाठी काही करावे असे आमच्यातील फार थोड्यांना वाटते.पूर्वी आमची शास्त्रे, उपनिषदे, तत्वज्ञान आम्हाला सांगत असत की इतरांसाठी जगा. फक्त स्वत:साठी जगू नका. आपली मने, हृदये विशाल करा. ‘सहनाववतु सहनौभुनक्तु...’ यात तेच सांगितले आहे. पण आम्ही काळानुसार बदललो. स्वत:ला मर्यादा घालून घेतल्या. आपल्या विचारांच्या, भावनांच्या कक्षा रुंदावण्याऐवजी संकुचित केल्या. त्यातून एकलकोंडेपणा वाढला. आजार वाढले. मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम झाला. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आदी आजार बळावले. आता विज्ञान आपल्याला सांगते आहे की, तुम्हाला जास्त जगायचे असेल तर तुम्हाला संकुचित मनोवृत्ती ठेवून चालणार नाही.प्रेम द्यावे लागेल आणि प्रेम घ्यावे लागेल. निरपेक्षपणे इतरांसाठी काहीतरी करावे लागेल. इतरांना आनंद देणे, त्यांच्या आनंदाने आनंदी होणे, दु:खाने दु:खी होणे यासारख्या शुद्ध भावनांनी आमचे जीवन निर्मळ आणि सुखी होईल. राग, लोभ, द्वेष, असूया , तृष्णा हे विकार आमच्या आरोग्याचे शत्रू आहेत. भगवद गीतेत श्रीकृष्णाने निष्काम कर्मयोग सांगितला आहे. त्याचे मर्म कदाचित हेच असावे. फळाची अपेक्षा न ठेवता काही चांगले काम करा.-विश्वास देशपांडे, चाळीसगाव
आपल्या हृदयाचे स्क्वेअर फूट वाढवता येतील?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 1:39 AM