सागर दुबे
जळगाव - अधिसभा निवडणूकीमध्ये पदवीधर गटासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र, काही लोकांकडून अधिकारांचा गैरवापर करून कुठलेही शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता न करता बोगस मतदार नोंदणी करण्यात आली असून कुलगुरू यांनी स्वत: लक्ष घालून बोगस १६ हजार मतदार नोंदणी रद्द करावी, अशी मागणी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी कुलगुरू डॉ व्ही.एल.माहेश्वरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, चौकशी न झाल्यास हा मुद्दा नॅक समितीसमोर उपस्थित करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
युवक काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी सोमवारी बोगस मतदार नोंदणीच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ.व्ही.एल.माहेश्वरी यांची भेट घेतली. त्यानंतर मतदान नोंदणीतील गैरप्रकाराबद्दल चर्चा करून निवेदन दिले. याप्रसंगी सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, ॲड. कुणाल पवार, गौरव वाणी, गणेश निंबाळकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले की, पदवीधर गटासाठी बोगस मतदान नोंदणी झाली असून कुलगुरू यांनी स्वत: कागदपत्रांची पाहणी करावी. त्याशिवाय विद्यार्थी संघटनांसमोर देखील बोगस नोंदणीच्या संदर्भातील आवश्यक ती कागदपत्र पाहण्यासाठी सादर करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, २५ ऑगस्टनंतर स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष ठेवून बोगस मतदार नोंदणी तात्काळ रद्द करून पारदर्शक पद्धतीने संपूर्ण अधिसभा निवडणूक पार पडेल असे आश्वासन कुलगुरू यांनी दिले.