‘स्त्री’ ही सृष्टीला मिळालेले एक वरदान आहे. कारण सृष्टीची निर्मिती आणि अंत तिच्या हातात आहे. ह्या स्त्रीचा सन्मान करण्यासाठी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.स्त्री ही नवनिर्मितीची जननी आहे. ‘पेरलं तसे उगवेल’ ह्या उक्तीप्रमाणे स्त्री जर साक्षर, सक्षम असेल तरच सर्व कुटुंब, समाज व देश क्रमाने साक्षर होतो. आजची स्त्री ही आपल्या सीमा विस्तारून जिद्दीने विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. अगदी पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई, ते अंतराळात झेप घेणारी कल्पना चावला व आपल्या जळगावच्याच मातीतील कवयित्री बहिणाबाई चौधरी, खान्देश कन्या प्रतिभाताई पाटील या सर्व स्त्रीयांनी सामाजिक मागासलेपणा आणि शैक्षणिक विषमतेला आव्हानात्मक तोंड देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या देशात अजूनही ‘स्त्री-पुरुष’ ही सामाजिक विषमता आणि पारंपारिक विचारांचा पगडा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ‘कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रीयांद्वारा केलेल्या प्रगतीनेच ठरते’ ह्या विचाराने प्रेरित होऊन कार्य करणारी आमची सी.एम.सी. कॉन्ग्रीगेशन द्वारे संचलित संस्था म्हणजेच सेंट टेरेसास कॉन्व्हेंट स्कूल ही होय. आमच्या शाळेच्या माध्यमातून, विविध उपक्रमातून तसेच मूल्याधिष्ठित शिक्षणातून स्त्रीयांना सक्षम करण्याच्या कार्यात सतत योगदान मिळत असते.महिला या काळ परिवर्तनाचा सशक्त घटक आहेत आणि त्या सामाजिक व अध्यात्मिक स्तरावर परिवर्तन नक्कीच घडवून आणतील. या विश्वासाने एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीस, ज्या काळात स्त्रीया शिक्षणापासून वंचित असत त्या काळात सी.एम.सी. कॉन्ग्रीगेशनचे संस्थापक संत कुरीयाकोस इलियास चावरा यांनी धाडसी निर्णय घेऊन स्त्रीयांच्या प्रगतीसाठी पहिली शाळा केरळ येथे सुरू केली. त्याद्वारे जास्तीत जास्त मुलींना शैक्षणिक संधी उपलब्ध झाल्या. संत चावरा यांच्या या प्रयत्नांमुळेच केरळ मधील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण हे इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजेच जवळपास ९४ टक्के आहे.-सिस्टर ज्युलेट अब्राहमप्राचार्या, सेंट टेरेसा कॉन्व्हेंट स्कूल.
‘सक्षम महिला, सक्षम समाज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:51 AM