लेखक - सुनील साळुंखे, शिरपूर
एकेकाळी राजधानीचे ठिकाण असलेल्या थाळनेर या ऐतिहासिक गावाचा लौकिक खान्देशात होता. आजच्या काळात त्यांचे अवशेष मात्र आढळतात. हजिरे (गोलघुमट) व भुईकोट किल्ला हे त्याची आज साक्ष देतात. त्या ऐतिहासिक वास्तू जोपासण्याच्या दृष्टीने मात्र काळाच्या ओघात प्रयत्न झालेला नाही. या ऐतिहासिक वास्तूंची जोपासना करणे हे थाळनेरच्या वैभवाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, ते होत नसल्याची खंत आहे.
थाळनेर गावाला एक अलौकिक महिमा प्राप्त झाला आहे. गानसम्राज्ञी लता दीदींच्या आई माई मंगेशकर यांचे थाळनेर हे माहेर. त्यांच्या वडिलांचे कुलदैवत खंडेराव असल्याने त्यांनी त्याकाळात मंदिर बांधले होते. त्या दिवसापासून मार्गशीर्ष चंपाषष्ठीला खंडोबाची यात्रा भरत असते. गावात मात्र खंडोबाचे एक आकर्षक असे मंदिर झाले नाही.
गावात अस्तित्वात असलेले हजिरे त्या काळातील स्थापत्य व शिल्पकलेचे दर्शन घडवितात. अशा पद्धतीची शिल्पकला व स्थापत्य असलेले हजिरे दुर्मीळच आहेत. आज त्या अवस्थेत आहेत ते तसेच टिकून राहावेत म्हणून त्यांची जोपासना करणे अतिशय महत्त्वाचे आहे; परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे व ग्रामस्थांचा पाठपुरावा नसल्याने या वास्तूंचे दिवसेंदिवस नुकसान होत आहे.
थाळनेर येथील हजिऱ्यांवरील बांधकामाचा प्रभाव हा मालवा व गुजरातचा दिसून येतो. असे असले तरी खान्देशातील राजांनी ही आपल्या स्थापत्य व वास्तुकलेचे अस्तित्व त्यात निर्माण केलेले दिसते. गोल घुमट (हजिरे) मध्ये बारीक नक्षीकाम जे झाले आहे,
त्यात गुजरात व मालवाचे प्रतिबिंब दिसून येते. हजिऱ्यांची जशी ही दुरवस्था आहे तशीच अवस्था भुईकोट किल्ल्याची आहे. मात्र, गत दोन वर्षांपूर्वी किल्ल्याची तटबंदी करण्यात येऊन काही प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. गावाचा ऐतिहासिक ठेवा जोपासण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन व ग्रामस्थांनी पाऊल उचलण्याची गरज आहे.
या किल्ल्याचे जनत व्हावे, यासाठी कुठलेही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे किल्ल्याचे बुरूजदेखील ढासळले आहेत, किल्ल्याच्या भिंती पडल्या आहेत. एकेकाळी राजधानीचे वैभव असलेला हा किल्ला आज मात्र भग्न अवस्थेत आहे. गावातील या ऐतिहासिक वास्तू जोपासल्या गेल्या असत्या तर भावी पिढीच्या दृष्टीने देखील ते अधिक मार्गदर्शक ठरले असते.
इतिहासप्रेमी व संशोधकांना या ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करण्याची नामी संधी जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्राप्त करून दिली आहे. या संधीचा फायदा घेऊन या वास्तूंचे संशोधन व्हावे, त्यांची जोपासना व्हावी ही रास्त अपेक्षा नागरिकांची आहे. हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा जोपासला जावा, अशी अपेक्षा आहे.