जळगाव - कार व बाईकची समोरासमोर धडक होऊन चाळीसगावात भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बाईकवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (16 नोव्हेंबर) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चाळीसगावापासून 2 किलोमीटर अंतरावर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. अर्जुन कचरु चव्हाण (वय 20 वर्ष) आणि केदार ज्ञानेश्वर महाले (वय 18 वर्ष)अशी मृतांची नावं आहेत. हे दोघंही चाळीसगाव येथील रहिवासी होते.
हे दोघंही चाळीसगावाहून डेराबर्डीकडे बाईकनं जात असताना धुळेच्या दिशेनं येणा-या कारनं त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. समोरासमोर धडक झाल्याने अपघातात अर्जुन व केदार जखमी झाले. उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी ( 17 नोव्हेंबर ) सकाळी चाळीसगाव शहर पोलिसात या दुर्घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.