जळगाव : भरधाव कारने ओव्हरटेक करताना दुचाकीला कट मारल्याने स्वत:ला सावरण्यात समोरुन येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक देत काही अंतरापर्यंत चिरडत नेल्याने दुचाकीवरील आते व मामेभाऊ जागीच ठार झाले. शोएब अली हारुन अली (२२) व त्याचा आतेभाऊ दाऊद शेख रियाजोद्दीन (२१) दोन्ही रा.पिंपळकोठा, ता.एरंडोल असे ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. शनिवारी सकाळी नऊ वाजता महामार्गावर मुसळी गावाजवळील कापसाच्या जिनिंगसमोर हा अपघात झाला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब हा पाळधी येथील इम्पीरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुरक्षा रक्षक तर दाऊद हा जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केटमध्ये मोटार वार्इंडींगचे काम करायचा. दोन्ही जण रोज एकाच दुचाकीने कामाला यायचे. शनिवारी सकाळी ते कामावर दुचाकीने (एमएच-१९-डीजे-१३४२) येत असताना मुसळीजवळील कापसाच्या जिनिंगजवळ मागून आलेल्या कारने ओव्हरटेक करताना दुचाकीला कट मारला. त्यामुळे घाबरलेल्या दुचाकीस्वारांनी स्वत:ला सावरत असताना जळगावकडून धुळ्याकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले. अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीसह दोघा तरुणांना ट्रकने काही अंतरापर्यंत फरफटत नेले. अपघाताची स्थिती पाहता ट्रकचालक लगेच फरार झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांनी दिली.जिनिंग कामगारांमुळे पटली ओळखअपघात होताच जिनिंगमध्ये कामाला असलेल्या कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. शोएब व दाऊद दोन्ही जागेवरच ठार झालेले होते. दुचाकी क्रमांक, खिशातील कागदपत्रांवरुन दोघांची ओळख पटली तर घटनास्थळावर काही तरुणांनी दोघांना ओळखले. त्यांनी तातडीने पिंपळकोठा गावात माहिती कळविली.दरम्यान, तेथून दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेबाबत पाळधी पोलिसांना विचारले असता आमच्यापर्यंत कोणतीच माहिती आली नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.नात्यापेक्षा मैत्रीच घट्टशोएब व दाऊद आतेभाऊ व मामेभाऊ असले तरी त्यांच्यात मैत्री अतिशय घट्ट होती. दोघे जण गावात समोरासमोरच राहायला होते. दाऊद याच्या पश्चात आई, भाऊ व बहिण तर शोएब याच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.
कारने कट मारला अन् दुचाकीसह दोघांना ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 7:08 PM